Breaking News

देश अस्थिर करण्यासाठी गैरसमज पसरवले जात आहेत - विवेक घळसासी


सोलापूर, दि. 02, मे - इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियाचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. प्रकरण आसिफाचं असो किंवा अन्य कोणताही असो.देशात निराशा पसरविण्याचे काम काही राजकीय मंडळी करित आहे. तेव्हा नागरिकांनी सावध राहण्याचे गरजेचे आहे. देश अस्थिर करण्यासाठीच काही प्रवृत्ती गैरसमज पसरवित असल्याचे विचार ज्येष्ठ निरुपणक  विवेक घळसासी यांनी मांडले. 

लोकमंगल को ऑप. बँकेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल को ऑप. बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह येथे शिवव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. घळसासी यांनी शिवरायांचे सावधपण आणि आजची वैर्‍याची रात्र या विषयावर विचार प्रकट केले. व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

घळसासी म्हणाले, आज जगात भारतीय अस्मितेला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. जगाच्या व्यासपीठावर भारताचा दबदबा निर्माण होत असताना देशात वातावरण मात्र अस्थिर करण्यासाठी काही जण प्रयत्न करित आहे. नाणार प्रकल्पाला होणारा विरोध असो की असिफाची झालेली हत्या असो यातून केवळ समाजात तेढ निर्माण केले जात आहे. ज्यांनी 21 दिवस संसद चालू दिली नाही तेच आज संविधान धोक्यात आली आहे असा गळा काढत आहे. खरे पाहता त्यांच्यामुळेच आज संविधान मोडत आहे. संविधानाची मोडतोड करून त्यांनीच देशावर आणीबाणी लादली असे काँग्रेसचे नाव न घेता घळसासी यांनी अप्रत्यक्ष टीका केली.