Breaking News

दखल - राज्य कायदा हातात घेणार्‍यांचं

कायदा करणार्‍यांवर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असते ; परंतु त्याचा त्यांना विसर पडतो. कायदा करणारेच कायदा हातात घेतात. सत्तेची मस्ती इतकी भिनते, की इतरांना मग कस्पटासमान लेखायला सुरुवात होते. सत्ता उच्चपदस्थांना संवेदनाहीन बनविते. त्याला कोणताही पक्ष मग अपवाद राहत नाही. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांची ओळख पूर्वी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणारे अशी ह
ोती ; परंतु त्यांच्याच पक्षाचे लोक भ्रष्टाचार करायला लागल्यानं या सोमय्यांची बोलतीच बंद झाली.


देशात सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचाराचे इतके प्रकार उघड व्हायला लागले असताना आणि जगात भ्रष्टाचारी देशात भारताचं स्थान उंचावलं असताना सोमय्या यांना मात्र आता कोणी भ्रष्टाचार करीत नसेल, असा साक्षात्कार व्हायला लागला आहे. त्यातही जनता जेव्हा जाब विचारते, तेव्हा सोमय्या यांच्यासारख्यांचं अवसान गळून पडतं. त्यांना काही सुचेनासं होतं. अविचारात मग ते कोणताही निर्णय घेतात, कृती करतात. मुंबईत रेल्वे पुलावर चेंगरांचेंगरी होऊन तीसहून अधिक लोकांचा बळी गेला असताना सर्व मुंबई शोकसागरात होती ; परंतु सोमय्या मात्र दांडिया खेळण्यात मग्न होते. असा खासदार लाभणं हे भाग्य, की दुर्भाग्य हे त्यांच्या मतदारांनीच ठरवायचं आहे. सोमय्या हे शीघ्रकोपी आहेत. कशावरून त्यांना राग येईल आणि ते काय करतील, याचा भरवसा देता येत नाही. भारतीय चलनाचा कायदा आहे. ते फाडता येत नाही. तसं केलं, तर तो गुन्हा होतो ; परंतु सोमय्यांना भारतीय चलन ही आपली वैयक्तिक मालमत्ता असल्याचं वाटत असावं. चलन जरी वैयक्तिक मालमत्ता असली, तरी ती नष्ट करता येत नाही किंवा तिचे विदद्रपीक रण करता येत नाही.
सोमय्या यांनी मैदानाजवळ जनसंपर्क अभियानाअंतर्गत स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक रहिवाशांनी संभाजी मैदानाच्या नूतनीकरणासह विविध विषयांवर सोमय्यांना लक्ष्य केलं होतं. संभाजी मैदानात महापालिकेककडून सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. खरं तर पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी असल्यानं सोमय्या यांना त्याचं भांडवल करता आलं असतं. या चर्चेच्या अखेरीस परिसरातील कचर्‍याचा विषयही पुढं आला. मैदानाजवळ व्यवसाय करणार्‍या काही फे रीवाल्यांना सोमय्या यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. सचिन खरात तिथं भाजी, फळविक्रीचा व्यवसाय करतात. सोमय्या यांनी शिवराळ भाषा वापरत इथं व्यवसाय करण्यास कोणी परवानगी दिली, असा प्रश्‍न केला. त्यांनी भाजी, फळे रस्त्यावर उधळण्यास सुरुवात केली. व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत असताना काही महिला घेतलेल्या भाजी, फळांचे पैसे देत होत्या. इतक्यात सोमय्या यांनी खरात यांच्या हाती ग्राहक महिलेनं दिलेले पैसे हिसकावले. ते सर्वासमक्ष टराटरा फाडले आणि खरातांच्या तोंडावर फेकले. फेरीवाल्यांवर क ारवाई करण्याचा अधिकार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचा आहे. भाजी, फळे जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. भाजी, फळे रस्त्यावर फेकण्याचा अ धिकार कुणालाही नाही. मात्र सोमय्या यांनी तसं केलं. शिवीगाळ करण्याचं काहीच कारण नव्हतं. खरात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. पाठोपाठ भाजप वगळून सर्वपक्षीय स्थानिक राजकीय मंडळींनी पोलीस ठाणं गाठलं. खरात यांनी तक्रार करू नये, यासाठी पोलीस ठाण्यात दडपण आणलं जात होतं. तसेच जबाबामधून पैसे हिसकावले, फाडले हा उल्लेख वगळण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलिसांनी सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदवणं अपेक्षित होतं; परंतु पोलिस अधिकारी ही सत्तेचे कसे मिंधे असतात, याचा अनुभव इथं आला. पोलिस उपायुक्त सिंग यांनी, तर ज्यांना या कारवाईबद्दल आक्षेप असेल किंवा ती अपुरी वाटत असेल, त्यांनी जरूर न्यायालयात जावं असं म्हटलं आहे. न्यायालय पोलिसांच्याच तपासावर निकाल देतात, हे त्यांना माहीत नसावं. सोमय्या यांना तर वारंवार संपर्क साधल्यानंतरही आपली प्रतिक्रिया द्यावी, असं वाटलं नाही.
एकीकडं सोमय्यांचा उद्दामपणा तर दुसरीकडं काँग्रेसच्या आमदारपुत्राचा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न. दोन्ही घटनांत साम्य आहे. कायदा हातात घेणं आणि दुसर्‍याला कवडीमोल किंमत देणं ही संरजामशाही वृत्ती झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार एन. ए. हारिस यांचा मुलगा मोहम्मद नालापद हारिस याच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदाराच्या मुलावर दोन महिन्यांपूर्वी एल विद्वत नावाच्या एका तरुणाला बेंगुळुरुमधील कॅफेत मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्राइम ब्रांच तपास करत होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून नालापद याच्यावर आरोप लावण्यात आला आहे, की त्याने विद्वत याला फक्त मारहाण केली नाही, तर आपल्या साथीदारांना हत्येसाठी उसकवलं होतं. 19 मार्च 2018 रोजी बेंगळुरुमधील युबी सिटी येथील कॅफेत दोघांचं भांडण झालं. नालापद याचा पाय विद्वतला लागला या क्षुल्लक कारणावरून हे भांडण झालं. विद्वत याच्या पायाला प्लास्टर लावण्यात आलं होतं. नालापदनं विद्वत याला फक्त शिवीगाळ केली नाही, तर आपला पाय चाटण्यासही सांगितलं. नालापद यानं विद्वतला, आपण आमदार एन ए हारिस यांचा मुलगा आहोत. तू माझ्या बुटाच्याही लायकीचा नाही आहेस. तू माझी माफी माग आणि माझे बूट चाटून साफ कर’, असं फर्मावलं. जेव्हा विद्वतनं असं करण्यास नकार दिला, तेव्हा नालापद आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर काचेच्या बाटल्या, बर्फाच्या बादल्या आणि इतर साहित्यानं मारहाण केली. नालापद आणि त्याचे मित्र अर्धमेला होईपर्यंत मारहाण करत होते. जर तू माफी मागितली नाहीस, तर तुला इथंच मारुन टाकू, अशी धमकी ते देत होते. पोलिसांनी याप्रकरणी तक्रारदार प्रवीण वेंकटाचलैया यांच्यासहित 23 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. नालापद याच्यासहित अन्य सात आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. घटनेच्या तीन महिन्यानंतरही इतर आरोपी कृष्णा आणि जवर यांचा पोलीस शोध घेत आहेत. काँग्रेसची सत्ता असतानाही इथं आमदार पुत्राला गजाआड जावं लागलं ; मात्र सोमय्या यांना वाचविण्यात महाराष्ट्र पोलिस धन्यता मानीत आहेत. नगर येथील प्रकरणात नाही का पोलिसांना उशिरा साक्षात्कार होऊन शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधातील कलमे वगळावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर त्यांचं गृहखातं दररोज शिंतोडे उडवीत असताना ते मात्र स्वस्थ बसून सर्व सहन करीत आहेत.