Breaking News

बेशिस्त बसमुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये मनस्ताप


शिर्डी/प्रतिनिधी -  येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये विविध उपचारासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील रुग्ण येत असतात. मात्र सायंकाळी रुग्णांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी साईआश्रम येथे जाणाऱ्या बस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक ६ वाजल्यापासूनच रस्त्याच्या कडेला उघड्यावर ताटकळत बसतात. या बेशिस्त बसमुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये मनस्ताप व्यक्त होत आहे.

साईबाबा संस्थानचे साईनाथ हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. अशावेळी वयोवृद्ध नातेवाईकही रुग्णाबरोबर आलेले असतात. जेवन, चहापान त्यांना सहज उपलब्ध होते. रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी साईआश्रम निमगाव येथे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र संस्थानकडे बसेसची संख्या व चालक कमी असल्याने या बसेस वेळेवर रात्री येत नाहीत. ९ ला येणारी गाडी अर्धा ते एक तास उशिरा येते. त्यानंतर या लोकांना आश्रमाच्या ठिकाणी आत प्रवेश दिला जातो. पास दाखविल्यानंतर त्यांना सोडले जाते. यात मोठा वेळ जातो. त्यामुळे या नातेवाईकांना झोपायला रात्रीचे ११ ते १२ वाजतात.