‘तो’ आवाज करतोय राहुरीकरांचे प्रबोधन!
राहुरी : ‘स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी, आपला परिसर स्वच्छ तर गाव स्वच्छ’ या ध्वनीफितीनेच हल्ली राहुरीकरांचा दिवस सुरु होतो. कचरा वेचायाला आणि गोळा करायला येणाऱ्या घंटागाडीतून ऐकायला मिळणारा हा आवाज स्वच्छतेविषयी नागरिकांचे प्रबोधन करत आहे.
शहराच्या तत्कालिन पहिल्या महिला नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांच्या संकल्पना आणि नियोजनातून राहुरी शहर ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करताना दिसत आहे. त्यानंतर या शहराची धुरा लोकनियुक्त विद्यमान नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आली. त्यांनीही शहर स्मार्ट सिटीकडे नेत याला मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात जनजागृती होण्यासाठी नुकतेच सार्वजनिक मंडळे व पदाधिकारी यांची त्यांनी बैठक घेतली. राहुरीला हरित शहर सुंदर शहर बनवण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र हे करत असताना दुसरीकडे शहराच्या विकासाला अडसर ठरत असलेली अतिक्रमणे व शहराच्या रस्त्यावरील पथारीवाले, किरकोळ विक्रेते तसेच अन्य खाद्य स्टॉल यामुळे रस्त्यांचा व शहराचा श्वास गुदमरला गेला आहे. शहर बकालावस्थेकडे वाटचाल करते की काय, असे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे शहराला अतिक्रमणांचा विळखा पडत चालला आहे. यामुळे साहजिकच शहराचे विद्रुपीकरण होत आहे. गुदमरलेल्या रस्त्यांचा व शहराचा श्वास मोकळा करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष तनपुरेना कणखर भूमिका घ्यावी लागणार आहे.
‘स्मार्ट सिटी’साठी कणखर भूमिका हवी
नगरपरिषदेला आजवर विकासाचे व्हिजन हाती असलेला एकही मुख्याधिकारी लाभलेला नाही. शहराचा नगररचनाकार पदावर काम करणारा अधिकारीदेखील अस्तित्वात आहे की नाही, हेच शहरवासियांना माहित नाही. शहराचा विकास होऊन ‘स्मार्ट सिटी’ करताना व्हिजन महत्त्वाचे आहे आणि ते राबविणारे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि अधिकारी यांचीही येथे भूमिका कणखर असायला हवी.