Breaking News

अंगणवाडी सेविकांना मानधन नको, वेतन हवे - एम. ए. पाटील


सोलापूर, दि. 05, मे - अंगणवाडी सेविका या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी मानण्यात याव्यात, त्यानुसार सेवालाभ व वेतन निश्‍चिती व्हावी. आता अंगणवाडी सेविकांना मानधन नको तर वेतन हवे ही प्रमुख मागणी राहणार आहे, त्यासाठी न्यायालयीन मार्गाने संघर्षास तयार राहा, असे आवाहन राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी येथे केले.
 
हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित अंगणवाडी महिलांचा आनंद मेळावा घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. 
पाटील म्हणाले, ’अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळते. एका बालकाच्या दोन वेळेच्या पोषण आहारासाठी केवळ पाच रुपये मिळतात. पाच रुपयांत बालकांचे पोषण कसे करता येईल ? याचा काही अंदाज तरी सरकारला आहे का ? केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न राज्याकडे टोलविला आहे. राज्याने निधीमध्ये कपात केली आहे. तो निधी दुप्पट करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांचे वेतन निश्‍चितीकरण व्हावे. या सेविका स्वयंसेविका नाहीत तर शासनाचे कर्मचारी आहेत. 25 दिवसांच्या काळात अंगणवाडी सेविकांनी निर्धाराने संपात सहभाग घेत, अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. हा लढा यशस्वी झाला असला तरी संप चिरडण्याचा प्रयत्न होता. संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यात आला. तरी अंगणवाडी सेविकांनी माघार घेतली नाही. अखेर लावण्यात आलेला मेस्मा सरकारला रद्द करावा लागला. मानधन वाढ ही मान्य केली. हे संघटनात्मक संघर्षाचे फलित आहे. अंगणवाडी सेविकांनी आगामी लढ्यासाठी सिद्ध राहावे, पुढील लढाई अधिक कठीण आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाही अनिवार्य आहे. त्यासाठी सज्ज राहावे.’