Breaking News

खेड नगराध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हा


 दि. 05, मे - कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या बुधवारी (दि. 2 मे) खेडच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


गेल्या 14 एप्रिल रोजी खवटी (ता. खेड) येथे दुचाकी आणि ट्रेलरच्या अपघातात विशाल मोरे हा तरुण आणि आयुष वाडकर या मुलाचा मृत्यू झाला होता. याबाबत मनसेने उपविभागीय अधिक ार्‍यांना निवेदन देऊन मृतांच्या कुटुंबीयांना भरघोस मदत देण्याची मागणी केली होती. कंपनीच्या बेजबाबदार कामाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या बुधवारी खेड येथे प्रांत कार्यालयासमोर मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक रस्त्यावर उतरले व त्यांनी सुमारे दीड तास खेड-दापोली मार्ग रोखून धरला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील नाईक प्रशांत चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते अजय माने, माजी नगराध्यक्ष उर्मिला पाटणे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वास मुधोळे आदींसह 100 जणांचा समावेश आहे.