पलूस-कडेगाव पोटनिवडणूक : मद्य व ताडी विक्रीस बंदी आदेश जारी
सांगली, दि. 12, मे - 285 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान व 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता जिल्हाधिकारी, सांगली यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी संपण्याअगोदरचे अठ्ठेचाळीस तास व मतमोजणी दिवशी संबधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-2, एफएल-3, फॉर्म ई, ई-2, एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2, सीएल-3, टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंदचा कालावधी व कंसात बंदचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे. मतदानाचा कालावधी संपण्याअगोदरचे अठ्ठेचाळीस तास शनिवार, 26 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजल्यापासून सोमवार, 28 मे रोजी मतदानाचा कालावधी संपेपर्यंत (285 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ व मतदारसंघाच्या लगतच्या 5 कि.मी. सीमा क्षेत्रातील). मतमोजणी दिवशी गुरूवार, 31 मे रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या क्षेत्रातील सर्व अनुज्ञप्त्या बंद राहतील). या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक ाविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
