न्या. लोया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनरावलोकन याचिका
नवी दिल्ली - न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. मात्र या निर्णयाविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशननी पुनरावलोकन याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न्याय्य नसल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. 19 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने लोया यांच्या मृत्यूची चौकशी करणारी याचिका फेटाळली. न्याय अधिकार्यावर विश्वास न ठेवण्याचे काही कारण नाही. याचिकाकर्त्यांनी न्यायपालिकेची प्रतिमा धूसर करण्याचा प्रयत्न केला, असे न्यायालयाने म्हटले होते. तेसच न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. माजी अॅटर्नी जनरल आणि या खटल्यात महाराष्ट्राचे वकील असणारे मुकूल रोहतगी यांनी या याचिका वैयक्तिक हेतूने करण्यात आल्या होत्या, असे म्हटले होते. रोहतगी म्हणाले, या याचिका सामाजिक नव्हे तर केवळ आणि केवळ वैयक्तिक हेतूने करण्यात आल्या होत्या. या याचिकेमागचा हेतू केवळ सरकारमधील काही वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणे एवढाच होता. याचिकाकर्त्यांनी कायद्याचे नियम पाळले नाही, असेही रोहतगी यांनी म्हटले होते. महाराष्ट्र सरकारच्या अहवालात खूप विरोधाभास असल्यामुळे त्याचा तपास करण्याचे आदेश दिला पाहिजे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. लोया यांचा मृतदेह त्यांच्या घरी का पाठवला नाही आणि त्यांच्या कुटुंबाला माहिती का मिळाली नाही? राज्य सरकारने या तपासाचा विरोध करू नये, असे याचिकाकर्त्याचे वकिल दुष्यंत दवे यांनी सांगितले.