Breaking News

माजी खा. गडाख आणि लंघे यांनी तालूका पिंजून काढला

सोनई : नेवासा तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, शासनाचा नुसताच घोषणांचा पाऊस, कृती मात्र शून्य, अशातच विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय नेत्यांची भर उन्हाळ्यात पायाला भिंगरी बांधल्यागत विविध ठिकाणी लग्न समारंभाला हजेरी लावण्याची कसरत सुरु जात आहे. यामध्ये माजी खा. तुकाराम गडाख आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आघाडीवर आहेत. या दोघांनी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण तालूका पिंजून काढला आहे. 
पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन नक्कीच उमेदवारी करणार, असे संकेत यातून गडाख आणि लंघे यांनी दिले आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह विधान सभेला इच्छुक असलेले नेते तालुक्यातील लग्न समारंभाला उपस्थिती लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर अनपेक्षितपणे बाळासाहेब मुरकुटे यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेस पक्षाला ‘जय हरी’ करून भाजपात प्रवेश केला. आणि शंकरराव गडाख यांचा पराभव केला. माजी आ. शंकरराव गडाख यांच्या आमदारकीच्या काळात मुळा धरणातून पाणी खेचून आणले होते. भर उन्हाळ्यात शेतीचे आवर्तन शेतकऱ्याला दिले. प्रसंगी आपल्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासही शंकरराव गडाख यांनी मागेपुढे पहिले नव्हते. विविध विकास कामासाठी शंकरराव गडाख यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मात्र निवडणूक काळात गहाळ राहिल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता, अशी तालुक्यात चर्चा झडत आहे. तर आ. मुरकुटे हे फक्त गडाख यांच्या ताब्यातील संस्थांना ‘टार्गेट’ करून चौकशी लावत असल्याची चर्चा आहे. आजी व माजी आमदार हे फक्त एकमेकांचे उणेदुणे काढण्यात दंग राहिल्याने तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 

एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याने परिणामी आजी व माजी आमदारावर मोठया प्रमाणावर नाराजीचा सूर दिसत आहे. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी तुकाराम गडाख यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखा तालूका पिंजून काढला आहे. त्यातच तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांसह नवीन युवक वर्ग आकर्षित करण्यात माजी खा. तुकाराम गडाख यांचा हातखंडा आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात युवक त्यांच्या पाठीशी दिसतात. तुकाराम गडाख आक्रमक भूमिका, सडेतोड बोलणे हे युवकाला प्रोत्साहित करताना दिसत आहेत. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारा नेता अशी त्यांची जिल्हयाला ओळख आहे. मात्र विधानसभेत तुकाराम गडाख हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तुकाराम गडाख यांनी जरी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी, अशी युवकांची अपेक्षा आहे. मात्र शेवगावचे घुले बंधू कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावर सगळं काही अवलंबून आहे.