Breaking News

पिंपरी - चिंचवड महापालिकेचे सशुल्क पार्किंग धोरण तयार

पुणे, दि. 11, मे - वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी पिंपरी - चिंचवड महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) धोरण तयार केले आहे. त्यासाठी पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करत दरपत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. गावठाण भाग आणि झोपडपट्टींना यातून वगळण्यात आले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी मासिक पास उपलब्ध करुन देण्याची तरतूद धोरणामध्ये आहे. तर, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे, यांना सशुल्क पार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. माहिती - तंत्रज्ञानाचा अवलंब करत महापालिका ’पार्किंग अ‍ॅप’ विकसित करणार आहे. याबाबतच्या धोरणाला झालेल्या स्थायी स मितीत मंजुरी देण्यात आली. या धोरणाची महासभेकडे शिफारस केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 21 लाख असून वाहनसंख्या 16 लाख आहे. हे नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनाने ये - जा करीत असतात. हे करताना वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक जटील प्रश्‍न बनला आहे. या प्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लावायचा निर्धार करत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सशुल्क वाहनतळाचे धोरण तयार केले आहे. त्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरु, नागपूर या शहराच्या पार्किग पॉलिसींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचे संगणकीय सादरीकरण महापालिका लोकप्रतिनिधींसमोर करण्यात आले. रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून ही जागा वाहनतळासाठी असल्याचे स्पष्ट केले जाणार आहे.