Breaking News

नालीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा आंदोलन

कोपरगाव: शहर प्रतिनिधीनगरपालिका हद्दीतील मार्केटयार्डरोडचे लाखो रुपये खर्चून डांबरीकरण झाले आहे. मात्र या रस्त्याच्या बाजुने असलेल्या नालीचे काम संथ गतीने सुरु आहे. परिणामी या भागातील व्यवसायिकांसह स्थानिक नागरिक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे पावसाळा तोंडावर आल्याने या नालीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी केली जात आहे. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या वर्षी याच रस्त्यावर पावसाळ्यात काम सुरु असताना येथे चिखल साचून घसरगुंडी झाली होती. त्यामुळे अनेक नागरिक आणि वाहनचालक घसरून पडले होते. या परिस्थितीची जाणीव ठेवून पालिकेने या परिसरातील नागरिक आणि दुकानदारांना दिलासा द्यावा. या रस्त्यांवर मार्केटयार्डचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्यासमोरच गटारीची नाली खोदून ठेवलेली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

या भागांत लाखो रूपये खर्च करून व्यावसायिकांनी गाळे खरेदी केलेले आहेत. परंतु दुकानांपुढे नाली खोदून ठेवल्याने ग्राहकांना दुकानात ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे व्यावसायिक वैतागले आहेत. त्यामुळे सदर काम पूर्ण झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब सांगळे, सचिन कुटाफळे, नितीन देवकर, अजय थोरात, साळुंके, संग्राम देवकर, अमोल देशमुख, अनिल आहेर आदी व्यापारी तसेच सुभद्रानगरच्या नागरिकांनी दिला आहे.