Breaking News

प्रा. व्हटकर यांच्या कथासंग्रहास साहित्य सभेचा पुरस्कार प्रदान

सोलापूर, दि. 30, मे - प्रा. अर्जुन यांच्या मुक्या जंगलाची गर्जना या कथासंग्रहास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार विचारवंत गोपाळ गुरू यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने मुक्या जंगलाची गर्जना हे पुस्तक प्रकाशित केले आहे. निसर्गाचा होत असलेला र्‍हास जंगलालाच गर्जना करायला भाग पाडतो, अशी अपरिहार्यता निसर्गाच्या वाट्याला यावी आणि ती माणसानेच उत्पन्न करावी या बद्दलची सजग अशी जाणीव या पुस्तकातून प्रा. व्हटकर यांनी मांडली आहे. या कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने विशेष पुरस्कार जाहीर केला होता. त्याचे वितरण 25 मे रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात पार पडले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. गोपाळ गुरू यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.