Breaking News

देशाच्या विकासात राज्याचा मोठा वाटा : आ. थोरात


संगमनेर विविध परंपरा लाभलेले महाराष्ट्र राज्य हे मोठ्या कष्टातून देशात अग्रेसर ठरले आहे. भारताच्या सातत्यापूर्ण विकासात महाराष्ट्राचा कायम मोठा वाटा राहिला आहे, असे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
महाराष्ट्रदिनानिमित्त {दि. १ } आ. बाळासाहेब थोरात आणि आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहन मोठ्या उत्साहात पार पडले. सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, बाळासाहेब पवार, सुरेश शिंदे, संजय बांगर, नितीन अभंग, सुरेशराव थोरात आदींसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री आ. थोरात आणि आ. डॉ. सुधीर तांबे यांना पोलीस पथकाने मानवंदना दिली. 

आ. थोरात म्हणाले, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा नेहमी मोलाचा वाटा राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यामध्ये शहीद झालेल्यांचे सर्वांनी स्मरण कायम ठेवले पाहिजे. महाराष्ट्र ही संताची, शूरविरांची भूमी आहे. सह्याद्री ते सातपुडा सारख्या विविध प्रदेशांनी नटलेल्या हा महाराष्ट्र आहे. निसर्गाने नटलेल्या या पुरोगामी महाराष्ट्राने सातत्याने देशाला विचारांची दिशा देशाला दिली आहे. पुढील काळात नव्या पिढीने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे. 

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी सर्वांनी एकात्मतेची शिकवण दिली. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा महान महिलांची परंपरा आहे. यावेळी शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.