Breaking News

प्रभारी अधिकार्‍यांच्या जीवावर जिल्हा विभाजन कसे? डॉ. सुजय विखे यांचा सवाल


पारनेर प्रतिनिधी - पालकमंत्र्याच्या जामखेड तालुक्यातच प्रभारी अधिकार्‍यांचे राज्य कार्यरत आहे. तरीसुध्दा जिल्हा विभाजनाचे स्वप्न दाखवलेच कसे जाते, असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. के. के. रेंजचा प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही डॉ. विखे यांनी दिली. 

तालुक्यातील ढवळपुरी येथे पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे फोंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान शिबिराच्या उदघाट्नप्रसंगी डॉ. विखे यांनी नगर दक्षिणेच्या खुंटलेल्या विकासाच्या प्रक्रियेवर नेमकेपणाने बोट ठेवून लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेवर कडक शब्दात टिका केली. 

ते म्हणाले, गेली अनेक वर्षे तुम्ही ज्यांना मतदान करता त्यांना जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा कोणी केला, योजनेचे पाईप कोणाच्या घरात गेले याची चौकशी होण्याची गरज आहे. ढवळपुरी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय हा विकासासाठी मिळालेला आहे. या गावाने पद्मभूषण खासदर साहेबांवर सातत्याने प्रेम केले. तेच प्रेम माझ्यावरही आज व्यक्त होत असल्याचा आनंद मोठा आहे. सामान्य माणसासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी करिता तालुक्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आज जिल्ह्यातील प्रशासन योजनांच्या अंमलबजावणीत ठप्प आहे. पालकमंत्र्याचा तालुकाच प्रभारी झाला असल्याने गुन्हेगारीने परिसीमा गाठली आहे. याप्रसंगी सभापती राहूल झावरे, पुप्षा वराळ, डॉ. राजेश भनगडे, डॉ. भास्करराव शिरोळे, दिनेश बाबर, शांताराम कुटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.