अग्रलेख - कर्नाटकातील सत्ता स्थापनेचा तिढा
कर्नाटक विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल आणि जेडीयू किंगमेकर ठरेल, अशी जी अटकळ बांधली जात होती, तिला भाजप धक्का देते की, काय अशी एकवेळची परिस्थिती होती. मात्र जेडीएस ने 38 जागा निवडून येत किंगमेकरची भूमिका निभवली. भाजपाने 104 जागा मिळवित सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र काँगे्रसने जनता दल सेक्यूलर सोबत हातमिळवणी केल्यामुळे कुमारस्वामी मुख्यमंत्री होण्याचे संकेत आहेत. मात्र राज्यपाल काय भूमिका घेतात. येदीयुरप्पा यांना आकडेवारी जुळवाजुळव करण्यासाठी वेळ देतात का? यातुन परत आमदार पळवापळवीचे राजकारण आणि अर्थ पूर्ण देवाणघेवाण होते का? हे सर्व अंदाज काही दिवसांत स्पष्ट होईलच. भाजपशासित राज्यातील राज्यकारभार हा पारदर्शक नसून, तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, सामाजिक धुव्रीकरणांच्या बाबी लक्षात घेता कर्नाटकात भाजप सत्तेवर येणार नाही, असा एक मतप्रवाह होता. तर दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकारचे चार वर्षांतील कामकाज इतके प्रभावी राहीले नाही. केवळ आश्वासनांचे गाजर दाखवणारे हे सरकार आहे, अशी ओरड सातत्याने होत होती. त्यामुळे या सर्वांचा फायदा काँगे्रसला होईल, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र सर्व शक्यता फोल ठरवत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात सिध्दरामय्या यांच्या सरकारने मागील पाच वर्षांत चांगले काम केले असे नाही. सिध्दरामय्या सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव असे क ामकाज केले आहे. मात्र या निवडणूकांत विकासकामांचा बोलबाला कुठेच पाहायला मिळाला नाही. दक्षिणेत शिरकाव करण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण होती. पंतप्रधान मोदींच्या झंझावती प्रचारसभांमुळे कानडी मुलूख ढवळून निघाला. कर्नाटकात भाजपने विजयाचा झेंडा रोवल्यामुळे एकप्रकारे पुन्हा एकदा मोदी आणि शाह या जोडागोळीच्या नेतृत्वावर एकप्रकारचे शिक्कामोर्तब पुन्हा एकदा झाले असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी मोदी यांचा मार्ग सुकर ठरण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपला विजयासाठी झुंजावे लागले होते. तसेच गोरखपूर आणि फूलपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवामुळे मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे कर्नाटकात विजयश्री खेचून आणूण पंतप्रधान मोदी यांनी आपली लाट ओसरली नाही, असे दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे काँगे्रसचे अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहूल गांधी यांचा हा पहिला पराभव आहे. कर्नाटक विजयामुळे देशात भाजपचे आता 21 राज्यामध्ये सत्ता स्थापन आहे. तर काँगे्रसचे वर्चस्व फक्त पंजाब, मिझोराम आणि पाँडेचरी या राज्यापुरते मर्यादित राहिले आहे. या तीन राज्यापैकी फक्त पंजाब एकच राज्य मोठे आहे. त्यामुळे काँगे्रसला पुन्हा एकदा आत्मचिंतन क रावे लागणार आहे. निवडणूका लढवण्यात मातब्बर असलेला काँगे्रस आता नियोजनात आणि अंमलबजावणीत कुठेतरी कमी पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे येणारा पुढील काळ काँगे्रससाठी कठीण काळ असणार आहे. दक्षिणेत भाजपच्या हातात असलेले एकमेव राज्य कर्नाटकमध्ये देखील मागील विधानसभा निवडणुकीत येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील 2008 ते 2013 दरम्यान भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पहिल्यांदाच विजय मिळाला होता. यावेळी देखील भाजपने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास टाकला. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर 6 दिवसांमध्ये तब्बल 21 सभा घेतल्या, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी 27 सभा आणि रॅली घेतल्या होत्या. त्यामानाने बघता काँगे्रसची मदार केवळ राहूल गांधी व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर होती. त्यामुळे काँगे्रस जनतेपर्यंत पोहचण्यात कुठेतरी कमी पडतांना दिसून येत आहे.