Breaking News

शहर इलाखातील पांढरपेशे दरोडेखोर गजाआड होतील का?

व्यवसायाने दरोडेखोर असलेल्या जातीवंत गुन्हेगारांना कायद्याच्या विविध कलमाखाली सजा ठोठावण्याची सोय राज्य घटनेने आपल्या व्यवस्थेत करून दिली आहे. चोरी किंवा दरोडा घालताना सापडल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. मात्र याच जातकुळीतील काही प्रवृत्ती सार्वजनिक बांधकाम विभागात राजरोस वावरत असून केवळ प्रशासकिय सेवेचे वस्र पांघरले असल्याने त्यांची दरोडेखोरी झाकली जात आहे इतकेच.
व्यावसायिक दरोडेखोरांपेक्षाही सार्वजनिक बांधकाम मधील हे दरोडेखोर निर्लज्ज असल्याचे शहर इलाखा सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत मंत्रालय आवारात झालेल्या कामावर टाकलेल्या दरोडेखोरीतून स्पष्ट झाले आहे. या पांढरपेशे दरोडेखोरांना साबांतून अभय मिळत असल्याने आजवर ही दरोडेखोरी पचवली गेली. मात्र सन 2015-16 या आ र्थिक वर्षात शहर इलाखा साबांतील या दरोडेखोरीने टोक गाठल्याने अति तिथं माती झाली आणि सारे पाप उघडे झाले. या आर्थिक वर्षात शहर इलाखा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके या जोडगोळीने संगनमताने 15 कोटी शासकीय निधीला चुना लावल्याची वाच्यता आहे.

गजबजलेला परिसर, चोवीस तास गृहखात्याच्या पोलीसांचा राबता पहारा असणारे, सामान्य प्रशासनाचे नियंत्रण असणारे, राज्याचे मुख्यालय असलेले मंत्रालय या मंडळीने जवळपास वर्षभर ओलीस ठेवले. यंत्रणेच्या डोळ्यात धुळ फेकून वर्षभराच्या कालावधीत तब्बल तेवीसशे ट्रक्सची आवकजावक दाखवली. एकाच दिवशी आठशे तीस मजूर मंत्रालयात राबविल्याचे दाखवून हजारो मजूरांना या परिसरात आणल्याची नोंद शहर ईलाखा साबां विभागाच्या मोजमाप पुस्तिकेत केली. मंत्रालयाची पुर्ण इमारत पाडण्याची वेळ आली तरी कदाचित या आर्थिक वर्षात या जोडगोळीने दाखवलेला फौजफाटा वापरावा लागणार नाही. ही वस्तुस्थिती असताना उघड झालेले हे सत्य आश्‍चर्यकारक नाही तर गंभीर आहे. ही बाब आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या साबांत खळबळ उडाली नाही तरच नवल. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर चौकशीचे चक्रे फिरली असली तरी मुंबई साबां अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून या मागचे सत्य लप विण्याचा प्रयत्न वारंवार केला. सरकारी आदेशात फेरबदल करण्यापासून कार्यकारी अभियंत्यांना वाचविण्यापर्यंतची अरविंद सुर्यवंशींची धडपड मुंबई साबां दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी मुळापासून केलेल्या चौकशीमुळे वाया गेली.
वास्तविक शहर इलाखा साबां विभागात झालेल्या अपहाराची पुर्ण चौकशी झाली असे म्हणता येणार नाही. बाहेर आलेले सत्य भष्टाचाराच्या हिमनगाचे एक टोक आहे. भ्रष्टाचाराचा हा हिमनग पुर्ण वितळून पाण्यासारखे नितळ सत्य बाहेर आणण्याच्या दृष्टीने आणखी खोलात जाणे आवश्यक होते. त्यासाठी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मंत्रालयात आलेला बाराशे ट्रक्स दगड, बाहेर गेलेले नऊशे ट्रक्स डेब्रीज आणि दोनशे ट्रक्स पेव्हर ब्लॉक आदी सुशोभीकरणाचे साहित्य मंत्रालयात कुठून कसे आणि कधी आले याची चौकशी करण्याचे आदेश झाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून हे आदेश निघाले असल्याने साबां आणि गृहखात्याच्या पातळीवरून ही चौकशी समांतरपणे होईल अशी अपेक्षा बाळगण्यास पुरेसा वाव आहे.
राहीला प्रश्‍न यातून सत्य बाहेर येण्याचा, तर गृहखात्याकडून होणारी चौकशी निष्पक्ष व्हायला कुठली अडचण दिसत नाही. साबांकडून मात्र चौकशीला न्याय मिळेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल असा आजवरचा अनुभव आहे. अवर सचिव संपत सुर्यवंशी आणि मुंबई साबां दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्या हेतूवरही शंका घेण्याचे कारण नाही. प्रश्‍न फक्त मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्या भुमिकेचा आहे. यापुर्वीचा त्यांचा ट्रक संशयाला वाव निर्माण करीत आहे. या घोटाळ्यात अडकलेले तत्कालीन शहर ईलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता आणि नाशिक साबांचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांची यापुर्वी लातूर उस्मानाबाद सोलापुरची कारकि र्द तपासायला हवी. अभिमन्यू नामक एक त्रयस्थ आणि माजी प्रभारी प्रधान सचिव यांचे आणि रणजीत हांडे यांचे तत्कालीन साटेलोटे तपासायला हवेत. आनंद कुलकर्णी प्रधान स चिव असतांना शहर इलाखा विभागात रणजीत हांडे यांनी आपल्या मर्जीतील कोणकोणत्या शाखा अभियंत्यांची बदली करून घेतली. या प्रथमदर्शनी छोट्या वाटणार्‍या मुद्यांचीही सखोल चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. या सर्व मुद्यांबाबत अरविंद सुर्यवंशी यांच्याकडे सखोल माहिती आहे. फक्त ती माहिती त्यांनी आपल्या चौकशी अहवालात प्रामाणिकपणे मांडायला हवी. इतकेच..!