Breaking News

भारतामध्ये सेवा क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी


मुंबई : जागतिक स्तरावरील सेवा उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी भारतात खुले वातावरण आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावरील आघाडीच्या देशांमध्ये आपला समावेश असून बँकिंग, विमा आदी आर्थिक सेवा, मनोरंजन उद्योग, आदरातिथ्य सेवा, शिक्षण, स्थावर मालमत्ता विकास सेवांमध्ये परदेशी गुंतवणुकीला प्रचंड संधी आहेत, असे मत ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस (जीईएस) 2018’ सेवा क्षेत्रातील जागतिक प्रदर्शनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आयोजित 'द इंडिया ऑपॉर्च्युनिटी-फोर्जिंग ग्लोबल पार्टनरशिप फॉर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट इन सर्व्हिसेस' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

भारत सरकारचा वाणिज्य विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय जागतिक स्तरावरील प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनामध्ये अनेक देशांमधील जागतिक स्तरावरील सेवा उद्योगांसह, भारतीय सेवा उद्योग आणि केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांनीही सहभाग घेतला आहे. सेवा क्षेत्रातील संधींबाबत माहिती‍ देण्यासाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या पहिल्या चर्चासत्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डेविड रस्किन्हा, जागतिक आर्थिक मंच एलएलसी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एलएलसी, अमेरिकेच्या कार्यकारी समितीच्या सदस्या झारा इंगिलिझियन, जेम्स एज्युकेशन, दुबईचे चीफ ॲकॅडेमिक ऑफिसर ॲन्थोनी लिटल, ऑस्ट्रेलियातील ग्लोबल सप्लाय चेन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सूद, अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक ट्रेव्हर बुल, युरोपियन सर्व्हिसेस फोरमचे व्यवस्थापकीय संचालक पास्कल केर्नेस, स्पेंटा मल्टिमीडिया प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मानेक डावर यांच्याशी सीएनबीसी-टीव्ही 18 च्या समूह संपादक (नागरी व्यवहार आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र) मनिषा नटराजन यांनी संवाद साधला.

श्री. गुप्ता यावेळी म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांच्या सहकार्याने भारतीय सेवा क्षेत्राचे गतीने जागतिकीकरण सुरु आहे. भारतात उत्पादित सेवा जगामध्ये विकल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात परकीय चलन भारतात येत आहे. त्यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगमुळे सेवांमध्ये रोजगार निर्मिती होईल. मूल्य शृंखला वाढवण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.