Breaking News

महाराष्ट्रातील ‘कॉमन सर्व्हिस सेंटर्सना’ ६ राष्ट्रीय पुरस्कार


नवी दिल्ली : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमाची’ आणि स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रातील ६ ‘कॉमन सर्व्हिस सेंटर्स’ना(सीएससी) आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कॉमन सर्व्हिसेस सेंटर्स स्कीम या विभागाच्या वतीने येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या स्टेन सभागृहात देशभरातून निवड झालेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर्ससाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १४ मे २०१८ रोजी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

देशभरातून ७०० प्रतिनिधींनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त विशेष उपक्रमाची’ आणि स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशभरातील १०० कॉमन सर्व्हिस सेंटर्सचा या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात आज कॉमन सर्व्हिस सेंटर्स स्कीम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.