Breaking News

सत्ता स्थापनेचे कर‘नाटक’ !

‘येडियुरप्पा’ मुख्यमंत्रीपदी विराजमान ; भाजपकडून संविधानाची थट्टा केल्याचा काँगे्रसचा आरोप 
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बंगळुरूमधल्या राजभवानात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर उपस्थित होते. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपकडे सध्या 104 आमदार असून बहुमतासाठी त्यांना आणखी सात आमदारांची गरज आहे त्यामुळे ते ही मॅजिक फिगर नेमकी कशी जुळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कर्नाटकमध्ये बहुमत मिळालेले नसताना देखील सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की भाजपने बहुमत नसतानाही कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अविवेकी अट्टाहास केला आहे. हा प्रकार संविधानाशी केलेली थट्टा आहे.

आज सकाळी भाजप आपल्या पोकळ विजयाचा उत्सव करत असताना देश मात्र लोकशाहीच्या पराभवाचा शोक व्यक्त करेल, असाही टोला राहुल गांधी यांनी लगावला.काँग्रेसचे दोन आमदार संपर्कात नसल्याचीही चर्चा होत आहे. मात्र यावर खुलासा करताना काँग्रेसचे आमदार खादेर यांनी सांगितले, की सर्व आमदार संपर्कात आहेत. दोन आमदार आत्ता हजर नाही, मात्र लवकरच ते येतील. मी देखील आत्ताच मंगलुरुवरून परत आलो आहे. ते बंगळुरू येथील इग्लेटोन रिसॉर्टजवळ बोलत होते.
येडीयुरप्पा यांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसने केलेल्या आंदोलनात देवेगौडा देखील सहभागी झाले. मोदी सरकार केंद्र सरकार या संस्थेचा गैरवापर करत आहे. मला माहिती आहे, की ते आमदारांना धमकावत आहे. मी माझे वडील एच. डी. देवेगौडा यांना पुढे येऊन नेतृत्व करण्याची आणि सर्व प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. यातून भाजप लोकशाही व्यवस्था कशी उद्ध्वस्त करत आहे हे स्पष्ट होईल. आम्हाला देशहितासाठी एकत्र येण्याची गरज आहे आमदारांना वाचवणे हाच आमचा प्लॅन आहे. भाजप आणि त्यांचे मंत्री आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेला केंद्र सरकारच्या या वर्तनाची माहिती असायला हवी. भाजपला बहुमत नाही. राज्यपाल असे कसे वागू शकतात? ते त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत, असा आरोप एच. डी. कुमारस्वामी यांनी यावेळी केला.