Breaking News

नाशिक महावितरण परिमंडळ मुख्य अभियंतापदी ब्रिजपालसिंह जनवीर यांची नियुक्ती

नाशिक, दि. 19, मे - महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार ब्रिजपालसिंह जनवीर यांनी स्वीकारला. यापूर्वी ते जळगाव परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर जनवीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनवीर यांनी प्रख्यात आयआयटी मद्रास येथून सन 1987 ला एम.टेक या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. महावितरणमधील 29 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी नाशिक येथे तत्कालीन राज्य विद्युत मंडळ आणि महावितरणमध्ये पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच मुख्य सामुग्री भांडाराचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता या पदांवर जवळपास 10 वर्षे कार्यरत होते. त्यामुळे नाशिक प रिमंडळातील विजेच्या समस्यांशी ते चांगलेच परिचित आहेत.
उस्मानाबाद आणि हिंगोली येथे अधीक्षक अभियंता या पदावर काम करताना वसुली व वीज गळतीचे आव्हान स्वीकारून प्रगती साधली. नागपूर येथे मुख्य अभियंता-गुणवत्ता व नियंत्रण, प्रकाशगड या मुख्य कार्यालयात खरेदी विभागाचे कार्यकारी अभियंता, मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोंदिया व जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी विशेष कामगिरी केली. कठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले जनवीर यांना वीज क्षेत्रातील निर्मिती, गुणवत्ता व नियंत्रण, संचालन व सुव्यवस्थापन, खरेदी व भांडार, पायाभूत आराखडा या विभागात कामाचा बहुआयामी अनुभव आहे.