Breaking News

हापूसची आवक वाढली

सिंधुदुर्गनगरी, दि. 19, मे - मे महिन्याच्या मध्यावर उष्णतेचा पारा चढल्याने सिंधुदुर्गच्या बाजारपेठेत हापूसची आवक वाढली आहे. सावंतवाडी बाजारात तर चक्क शंभर रूपये डझन दराने हापूस उपलब्ध आहे. यामुळे आंबा खवय्यांना जणू पर्वणीच लाभली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त आंबा हा सावंतवाडी शहरात दाखल होतो. सावंतवाडी, वेंगुले, दोडामार्ग, कुडाळ आदी तालुक्यातील विविध छोटे मोठे व्यापारी भर सकाळीच आंबे विक्री साठी आणतात. सकाळी सहापासून आंब्याची मोठी खरेदी विक्री सुरु होते. स्थानिक व्यापारी या गावातील शेतकरी वर्गाकडुन शंभर रूपये डझनने आंबे घेवून वीस रुपयांच्या फरकाने विकतात. 
आज सावंतवाडी बाजारात हापूस आंबा 100,120 ,150, 180 व सर्वात मोठा 200 रूपये डझनने विकला जात होता. तर पायरी आंबा 100 ते 150 रूपये डझनने विकला जात होता. गोवा माणकूर दीडशे रूपये डझन दराने विकला जात होता. मेच्या शेवटी दाखल होणारा माणकूर तुरळक प्रमाणात दाखल झाला होता. मात्र माणकूरचा दर घसरला असून 80 रूपये डझन ऐवढा खाली आला आहे. रत्नागिरी हापूसचा दर 150 ते 200 रूपये डझन आहे. आंब्याने सावंतवाडी बाजारपेठ फुलून गेली असून दर उतरल्याने खरेदी करणार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी मात्र चिंतातूर झाला आहे आणि त्यात भर पडली आहे ती अवकाळी पाउस आणि वादळी वार्‍याची.