Breaking News

… म्हणूनच देशावर आज वाईट दिवस : कॉ. गुरव

जी माणसे स्वतःपुरता विचार करतात, त्यांना माणूस म्हणत नाही. या देशातील कष्टकरी कामगारांच्या परंपरेने खऱ्या अर्थाने माणूसपण टिकवले आणि वाढवले. ऐतखाऊ ब्राम्हणी परंपरेने कायम मानवता वादाच्या विरोधात काम केले.आज तेच कपट कारस्थान करत सत्तेवर आलेत. म्हणून देशावर आज वाईट दिवस आले, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केले.

शहरातील घरेलू कामगार महिलांच्यावतीने दरवर्षी कामगारदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, यावर्षी अण्णाभाऊ साठे, नारायण मेघाजी लोखंडे आणि संविधानाचा गौरव करून कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यावेळी कॉम्रेड गुरव बोलत होते. ते म्हणाले, देशातील कामगारांच्या ताकतीला संघटित करून नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरवात केली.गिरणी कामगारांनी दिशादर्शक काम केले आणि अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख यांनी या कामाला संस्कृतीक मूल्याचा मुलामा चढवला यातूनच संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. याच लढयांनी कामगार कायदे निर्माण झाले. देशातील कामगार लढ्यांना या लढ्याची मोठी प्रेरणा मिळाली. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराला हक्क मिळून दिले आणि कायदा करून लढ्याच शस्त्र हाती दिलं. पण आज कामगारांच्या कायद्यांना नष्ट करून भाजप सरकार संबंध देशातील कष्टकरी जनतेच्या मुळावर उठले आहे. संविधान बदलवण्याची भाषा करत आहेत. मनुस्मृतीचे अन्यायकारक कायदे राबवण्याचे काम ते करत आहेत. म्हणून देशातील बलात्कार थांबत नाहीत. दलित, आदिवासी, ओ बी सी आणि अल्पसंख्याक वरील अन्याय थांबत नाहीत. त्यासाठी सर्वांनी संविधान वाचवण्यासाठी लढले पाहिजे.

सुवर्णा जगधने, वर्षा बाचकर, आइशा शेख सामाजिक समता मंचाचे विनायकभाऊ निकाळे यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचलन संदीप कोकाटे यांनी केले. छाया जगधने यांनी आभार मानले. शेवटी रंगविद्रोही कला मंचाच्या शाहीर सागर दोंदे यांच्या शाहिरीने कार्यक्रमाचा समारोप झाला.