Breaking News

आयकर अधिकार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात राहणार्‍या एका आयकर अधिकार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. बबलू कुमार प्रसाद (वय-32) असे आत्महत्या केलेल्या आयकर अधिकार्‍याचे नाव आहे. पोलिसांना त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बबलू कुमार हे आईसह आकुर्डी परिसरात वास्तव्यास होते. साधारण दोन वर्षापूर्वी त्यांचा एक पाय शरीरापासून वेगळा करण्यात आला होता. तेव्हापासून ते तणावात होते. दरम्यान, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांना बबलू कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे.