Breaking News

पाकच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद


जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकच्या लष्कराने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान शहीद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ मे रोजी काश्मीर दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वीच पाकने आगळिक केली आहे. त्यास भारतीय फौजफाट्याने जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकारामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. .

काश्मीरलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकने कुरापत काढल्यामुळे मागील महिनाभरापासूनची शांतता संपुष्टात आली आहे. या ठिकाणी पाकच्या सैनिकांनी चालू वर्षाच्या प्रारंभी गोळीबार केला होता. सांबा जिल्ह्याच्या मंगुचक परिसरातील मुख्य चौक्यांवर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाकच्या हद्दीतून विनाकारण बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. त्यास बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही बाजूंनी साधारणत: तासभर गोळीबार सुरूच होता. यात कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह हे पाकच्या गोळीबाराचा शिकार बनले आहेत. त्यांच्या चौकीत एक छिद्र होते. त्यामुळे सिंह यांना गोळी लागली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. त्यानंतरही काही अंतराने गोळीबार होतच राहिला. .