Breaking News

एकत्र येवून दुष्काळास हरवूया

देश जरी 1947 मध्ये स्वतंत्र झाला असला तरी, आता आपल्याला दुष्काळाविरूध्द दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. मानवता या एकाच धर्माखाली एकत्र येऊन दुष्काळास हरवुया असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले. राक्षसवाडी बु. येथे आज ग्रामस्थांसोबत श्रमदान करताना ते बोलत होते. यावेळी मा जि.प. सदस्य शांतीलाल कोपनर, सरपंच अश्‍विनी भवाळ, उपसरपंच पदमबाई बाराते, दिनकर कोपनर, मेजर रामहरी कोपनर, विजय माने, भाऊसाहेब शिपकुले, पंडीत शेळके यांचेसह ग्रामस्थ ऊपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, दुष्काळावर मात करण्यासाठी निसर्गाशी मैत्री करूया. आपल्या महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली करण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहेत. परिस्थितीशी झगडणार्‍या येथील हसर्‍या चेहर्‍यांच्या नागरिकांचा मला अभिमान आहे. मा. जि.प. सदस्य शांतीलाल कोपनर या वेळी म्हणाले की, सर्व ग्रामस्थांनी जात, पात, धर्म, पक्ष हे बाजुला ठेवुन आपल्या गावाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी श्रमदान करून दुष्काळाला हरवू आणि गाव जलसमृध्द करूया, यावेळी सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले.