नगर-मनमाड महामार्गाच्या साईडपट्ट्या उखडल्या
राहुरी : नगर मनमाड राज्यमार्गावरिल साईडपट्या उखडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याने चालताना रोजच संघर्ष करावा लागत आहे. तालुक्याच्या हद्दीतून धामोरी खुर्दपासून राहुरी शहर ते कोल्हार खुर्द हा साधारण ३० कि. मी. लांबीचा राज्यमार्ग आहे. या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या अर्धा ते पाऊन फुट उंच उखडल्या गेल्या आहेत. महामार्गाच्या दोन्हीही बाजूचा भराव खचला आहे. परिणामी रस्ता अपघातास निमंत्रण मिळत आहे. या राज्यमार्गावर वाहने चालवताना दुचाकीस्वारासह मोठ्या वाहनांनाही कसरत करावी लागत आहे. महामार्ग चौपदरीकरण करताना व नंतरही या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या संबंधित संस्थेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.