जवळा परिसरात कडब्यासह ट्रक जळून खाक
जामखेड : तालुक्यातील जवळा येथील करमाळा रोडवर कडब्याच्या घेवून जाणार्या ट्रकला लागलेल्या भीषण आगेत कडब्यासह ट्रक जळून खाक झाला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
जामखेड तालुक्यातील जवळा गावातुन शेतकर्याचा कडबा घेऊन कर्जत तालुक्यातील जळकेवाडीकडे जात असणारा कडब्याने भरलेला ट्रक गावापासून करमाळा रोडवरील जवळा चौफुल्यावरून जात असताना, वर असणार्या विजेच्या तारांना स्पाकिर्ंंग होऊन प्रथमता आगीचे गोळे उडून चकमक झाली. त्यानंतर क्षणार्धात कडब्याने पेट घेतला, अचानक लागलेली ही आग पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. आग विजवण्याचा नागरिकांनी पुरेपूर प्रयत्न केला, मात्र रात्रीची वेळ व अचानक घडलेला प्रकार हे पाहता उपस्थित नागरिकांना पुरेपूर मदत कार्य करता न आल्याने कडब्याचा ट्रक जळून खाक झाला. ही आग सायंकाळी 7.50 या वेळी लागली होती. त्यानंतर 8.40 पर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून कडब्यासह ट्रक जळून बेचीराख झाली होती. सुदैवाने प्रसंगावधान बाळगून चालक व क्लिनर यांनी उड्या टाकल्याने दोघे ही बचावले असुन कुठलीच जीवीतहानी झाली नाही.