Breaking News

देशातील निवडक 55 स्थानकांवर बालकांसाठी मदत केंद्र, सोलापूरचाही समावेश


सोलापूर, दि. 2, मे - देशात दरवर्षी हजारो बालके गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हरवतात. यापैकी काहींचा शोध लागतो, तर काहींचा लागत नाही. गेल्या वर्षी देशभरातील रेल्वेस्थानकांवरून 10 हजार 200 बालके हरवलेली आहेत. रेल्वे फलाटावर व रेल्वेत हरवणार्‍या बालकांची संख्या जास्त असल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महिला व बालविकास मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाने देशातील निवडक 55 स्थानकांवर बालकांसाठी मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. 

यात मुंबई, पुणे ,चेन्नई, कोलकात्यासह सोलापूरचा समावेश आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणे हे सोपे होणार आहे. रेल्वेत हरवलेले अथवा ट्रॅकवर कचरा वेचणारे, बेवारस स्थितीत आढळलेल्या बालक ांसाठी स्थानकावरच चाइल्ड हेल्प डेस्क काम करेल. प्रत्येक स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर हेल्प डेस्कचे कार्यालय असेल. हे 24 तास कार्यरत राहील. दर महिन्याला कामाचा अहवाल संबंधित डीआरएम यांच्याकडे व महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवला जाईल. या केंद्राचा मोठा फायदा होणार असल्याचे रेल्वे संघटनांनी सांगितले.