Breaking News

सलग सुट्यांमुळे 45 हजार पर्यटकांनी दिली महाबळेश्‍वरला भेट

सातारा, दि.3, मे - महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्‍वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल 45 हजार पर्यटकांनी महाबळेश्‍वरला भेट दिली. एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना महाबळेश्‍वरच्या थंड व आल्हाददायी वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.

पर्यटन हा महाबळेश्‍वर व पाचगणीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शनिवार, रविवार, बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल 45 हजार पर्यटकांनी महाबळेश्‍वर, पाचगणीला भेट दिली आहे. महाबळेश्‍वरात असलेले केट्स, लॉडविक, आर्थरसीट, बॅबिग्टन, एल्फिस्टन, विल्सन आदी ब्रिटिशकालीन पॉईंट पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉईंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून जात आहेत. तर नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावावर पर्यटकांची सायंकाळी नौकाविहार करण्यासाठी झुंबड उडत आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणा-या तापोळ्याला पर्यटक भेटी देत असून, येथील शिवसागर जलाशयातही नौकाविहार क रीत आहेत.