Breaking News

रिफायनरी प्रकल्पातील रोजगारांना 42 उद्योजकांकडून पर्यायी रोजगार

रत्नागिरी, दि. 18, मे - राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पातील चौदा गावांसह त्या परिसरातील अन्य गावांमधील लोकांना रोजगार मिळवून देण्याबाबत नामवंत 42 उद्योजक ांनी उत्सुकता दाखविल्याची माहिती कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे रिफायनरी उभारली नाही, तरी स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने प्रकल्पाची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाणार परिसरामध्ये उभारल्या जात असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. तरीही प्रकल्पाच्या समर्थकांकडून या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार असल्याने प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ रोजगाराचा मुद्दा समर्थकांकडून लावून धरला जात असताना प्रकल्पविरोधी समित्यांनी मात्र आता स्थानिकांना गावातच रोजगार देण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध सुरू केला आहे. त्यातून नामवंत 42 उद्योजकांनी नाणार परिसरामध्ये उद्योग उभारून स्थानिकांना रोजगार देण्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प हटविल्यानंतर या उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचा विश्‍वा स प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष श्री.  वालम यांनी व्यक्त केला आहे. या उद्योगांचे नेमके कामकाज कसे चालते, याची माहिती देण्यासाठी लवकरच स्थानिक मंडळींना मुंबईला येण्याचे आमंत्रण देत असल्याचे श्री. वालम यांनी स्पष्ट केले. मुंबईत ज्या वस्तूंचे उत्पादन होते, त्याचे स्थानिक पातळीवर उत्पादन झाल्यास त्यापोटी होणारा जाण्या-येण्याचा वाहतूक खर्च अधिक धरला तरी नफ्यात फारशी घट होणार नाही. याबाबत लवक रच सोसायटीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेतकर्‍यांनी आपल्या कातळ जमिनींबाबत संबंधित उद्योजकाशी ठराविक वर्षांचा सामंजस्य करार केल्यास येथे उभ्या राहणार्‍या उद्योगधंद्यातील पंचवीस टक्के नफा संबंधित शेतकर्‍यांना देण्याची तयारी या उद्योजकांनी दर्शवली आहे. त्याचा फायदा त्या शेतकर्‍यांना मिळणार आहे. मुंबईत राहून महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणार्‍या स्थानिक युवकांना आपल्या गावातील घरात राहून तेवढेच वेतन देणारी नोकरी मिळणार असल्याचा विश्‍वासही अशोक वालम यांनी व्यक्त केला.