Breaking News

दुधाच्या भुकटीला 3 रुपये अनुदान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : दूधाला प्रति लिटर 27 रुपये दर मिळावा यासाठी राज्यभरात शेतकरी संघटना आंदोलने करत आहेत. यावर राज्य सरकारने दूधाच्या भुकटीला प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून दूधाची पावडर बनवणार्‍या खासगी तसेच सहकारी दूध महासंघाना प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी मंत्रालयात दिली.

जानकर म्हणाले, राज्यात सध्या अतिरिक्त दूधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल दूध भुकटी निर्मिती प्रक्रिया घटवण्याकडे असल्याचे दिसून आले आहे.  अशा प रिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरीता शेतकर्‍यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे. त्यामुळे दूध भुकटी तयार करणार्‍यांवर अधिक भर देण्याचा शासनाचा विचार असून त्यासाठीच प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जानकर यांनी सांगितले. मार्च 2018 अखेरपर्यंत 26 हजार 506 . 70 मेट्रीक टन इतका दूध भुकटीसाठा शिल्लक होता. पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित के लेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणार्‍या सहकारी आणि खाजगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दूधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.