तनपुरे कारखाना कार्यस्थळी 3 दिवस उपोषण करण्याचा इशारा
राहुरी: डॉ. तनपुरे कारखान्याया निवृत्त कर्मचार्यांना न्यायालयाने मंजूर केलेली रक्कम महसूल विभागाला वसूल करून देण्याचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान, आरआरसी वसूली होत नसल्याने तनपुरे कारखान्याच्या निवृत्त कर्मचार्यांचा प्रश्न प्रलंबीत असल्याने 8 निवृत्त कर्मचार्यांनी तनपुरे कारखाना कार्यस्थळी 3 दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 दिवसात प्रश्न न सुटल्यास जीवन यात्रा संपविण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याचे सुरू झाले असले तरीही आर्थिक अरिष्ट मात्र कायम आहे. तनपुरे कारखान्याच्या कामकाजात संपूर्ण जीवन वाहिलेले बहुतेक कामगार निवृत्ती वेतन, पेंशन फंड, ग्रॅज्यूटी आदी निधी प्राप्त करण्यासाठी आजही लढा देतच आहेत. कामगारांनी न्यायालयात लढा देत असताना अनेक कामगार मयतही झाले. शेवटी न्यायालयाने निवृत्त कर्मचार्यांच्या समस्या लक्षात घेत डॉ. तनपुरे कारखान्याकडून वसूली करत निवृत्त कामगारांची देणी देण्याचा आदेश महसूल विभागाला दिला आहे. त्यानुसार प्राथमिक कार्यवाहीसाठी महसूल विभागाने पुढाकार घेतलाही होता. कारखाना सुरू झाल्यानंतर कामगारांची देणी दिली जाईल अशी अपेक्षाही निवृत्त कर्मचार्यांना होती. मात्र, कारखान्यासह महसूल विभागाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याने हताश झालेल्या 8 निवृत्त कर्मचार्यांनी उपोषण करीत जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतले असल्याचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदनातून सांगितले आहे. दि. 16 मे पासून कारखाना कार्यस्थळावर ऊन,वारा, पाऊस याचा विचार न करता डोक्यावर सावली न घेता दि. 18 पर्यंत उपोषण केले जाणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. आरोग्य खर्चासह चरितार्थ भागविणे निवृत्त कर्मचार्यांना शक्य होत नसल्याने शेवटी जीवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचा ईशारा निवेदनातून कर्मचार्यांनी दिलेला आहे.