Breaking News

वृध्द शेतकर्‍याची 35 लाखाची फसवणूक प्रकरणात इगतपूरी पोलीसांवर संशयाची सुई खोटे गुन्हे दाखल करण्याची भिती दाखवल्याचा आरोप

कुमार कडलग/नाशिक। 28  जिल्ह्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा राबवित असलेली नौटंकी ठरावी अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. समाजाला गुन्हेगारी मुक्त क रण्याचे आव्हान स्वीकारलेल्या पोलीस यंत्रणेकडून जिल्हा पोलीस दलातीला खाकीच्या आड दडलेल्या गुन्हेगारीला पाठीशी घातले जात असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या प्रयत्नांविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील एका वृध्द शेतकर्‍याला मिळालेल्या लाखो रूपयांच्या नुकसान भरपाईवर हातसफाईने डल्ला मारणार्‍या चौकडीला स्थानिक पोलीस ठाण्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून वेसन घालण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ होत असल्याने हा संशयकल्लोळ अधोरेखीत झाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील तळोशी गावातील 73 वर्षीय वृध्द शेतकरी विठ्ठल भोरू गिते यांना समृध्दी महामार्गासाठी शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून रू 74,88,820 रकमेचा धनादेश आयडीबीआय बँक घोटी या त्यांच्या खात्यावर जमा केला होता. यानंतर विठ्ठल गिते यांच्या भावकीतील मंडळींनी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस काँन्सटेबल महिरे यांना हाताशी धरून या वृध्द शेतकर्‍याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जमा रकमेपैकी 3494100/ एव्हढ्या रकमेचा धनादेश लिहून घेत सदर धनादेश भावकीतील एका संशयीताने स्वतःच्या खात्यावर जमा केला, अशा आशयाची तक्रार अन्यायग्रस्त वृध्द शेतकरी विठ्ठल गिते यांनी 30 मार्च रोजी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेश शिंगटे यांना दिली. त्यानंतर या वृद्ध शेतकर्‍याला न्याय मिळवून देण्याऐवजी वृध्दासह कुटुंबियांना धमकावले जात असून गुन्ह्यात अडकावण्याचा धाक दाखविला जात असल्याचे वृध्द शेतकर्‍याच्या नातेवाईकाने लोकमंथनशी बोलतांना सांगीतले.
हे प्रकरण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या दरबारात दाखल झाल्यानंतर न्याय मिळेल ही अपेक्षाही फोल ठरल्याने न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्‍न विठ्ल गिते कुटूंबियांसमोर उभा आहे.
संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस यंत्रणेने अनेक अवैध धंद्यावर छापा मारण्याचे सत्र सुरू केल्यानंतर जिल्ह्यातून अवैध धंदे पुर्णतः उध्वस्त होतील ही आशाही भाबडी ठरून वृध्द शेतकर्‍यांच्या घाम आणि रक्त पिण्याची नवी संस्कृती फोफावल्याचे इगतपुरीच्या या प्रकरणातून समोर आले आहे.
इगतपुरी पोलीस ठाणे आणि ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेचे एकूण कार्यतंत्रच संशयास्पद असून गुन्हेगारी वर्तुळाशी असलेले लागेबांधे बळकट करण्यात एक पथक व्यस्थ असल्याचे दाखले उपलब्ध आहेत.
इगतपुरी पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळणारे पोलीस निरिक्षक राजेश शिंगटे यांची कर्तव्यदक्षता या संदर्भात अधिक संवेदनशील असून गुन्हेगारी प्रवृत्तीविरूध्द उचलले पाऊल शिंगटे आणि कंपनीसाठी शत्रूसम ठरते. हा कटू अनुभव पत्रकारांनाही वेळोवेळी आला आहे.इगतपुरीप्रमाणेच ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेतही अस्तनीतील साप वळवळत असल्याचा कटू अनुभव येत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांची गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करण्याची मोहीम फार्स बनून राहीली आहे.(क्रमशः) 

इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल महिरे यांचा या प्रकणातील सहभाग दडविण्यासाठी फिर्यादी विठ्ठल गिते या 73 वर्षीय शेतकर्‍यावर पोलीस यंत्रणेकडून दबाव टाकला जात असून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप गिते यांच्या आप्तस्वकीयाने केला आहे.