Breaking News

टाटा नगर, देवनार परिसरातील 35 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

मुंबई, दि. 14, मे - बृहन्मुंबई महापालिकेच्या ’एम पूर्व’ विभागातील देवनार परिसरातील टाटा नगरमधील पाचनळ भागात देवनार सबनाल्याला लागून महापालिकेचा भूखंड आहे. या भूखंडावर गेल्या काही महिन्यात तात्पुरत्या स्वरुपाची अतिक्रमणे उद्भवली होती. यामध्ये प्रामुख्याने 35 अनधिकृत झोपड्यांचा समावेश होता. पत्रे ठोकून उभारण्यात आलेल्या या झोपड्यांमुळे देवनार सबनाल्याची पावसाळापूर्व सफाई करण्यास व नाल्याच्या रुंदीकरणात काही प्रमाणात अडथळे येत होते. मात्र, मुंबई पोलीसांच्या सहकार्याने नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ही सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ज्यामुळे आता नाल्यालगतची जागा मोकळी होण्यासह देवनार सबनाल्याची पावसाळापूर्व सफाई करणे अधिक सुविधाजनक होणार आहे, अशी माहिती एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या परिमंडळ - 5 चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार ’एम पूर्व’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत महापालिकेच्या 35 कामगार - कर्मचारी - अधिक ारी सहभागी झाले होते. तसेच देवनार पोलीस ठाण्याचे 30 पोलीस कर्मचारी - अधिकारी यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या कारवाईसाठी 1 जेसीबी, 1 डंपर, 1 पोकलेन यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.