Breaking News

प्रमोद बापट यांना गोपाल कुसुम पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 14, मे - सर्वत्र भोगवाद बोकाळला आहे. अंधकार पसरला आहे. अशा परिस्थितीत समाजाला मोकळा श्‍वास घेता यावा, अंधार दूर व्हावा म्हणून हातात पणती घेऊन मार्ग चालणार्‍या एका संस्कृतीरक्षकाचा हा उचित सन्मान आहे. विट्ठलाची पूजा सगळेच करतात. पण त्याच्या पायीच्या विटेची पूजा कोणी करत नाही. प्रमोद बापट यांचा सत्कार हा त्या विटेचा सत्कार आहे, असे कौतुकोद्गार राजदत्त यांनी काढले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांना आज गोपाल कुसुम संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ सभागृहात, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विलेपार्ले येथील माजी भाग संघचालक व गोरेगाव फिल्म स्टुडिओजचे मालक असणारे रमेशभाई मेहता कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीला सरोजिनी अकादमीच्या वतीने गोपाल कुसुम संस्कृती पुरस्काराने गौरवण्यात आले. सरोजिनी अकादमी आणि उत्कर्ष मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमोद बापट यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, माणूस हा विटेसारखा असतो. फक्त पुंडलिकाच्या हातची वीट व्हायचे की सीमेवर सैनिकांवर हल्ला करणार्‍यांच्या हातची वीट व्हायचे, ते आपले आपण ठरवायचे आहे. पुंडलिकाच्या हातची वीट असल्याचा अत्यंत अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण राष्ट्रीय विचारांचे आहोत म्हणून डावलले जाण्याच्या काळात, दीर्घकालीन आणीबाणीच्या काळात असे पुरस्कार मनाला उभारी देतात, असेही ते म्हणाले.
दै. नागपूर तरुण भारतचे माजी संपादक व साहित्यिक दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांचा सरोजिनी अकादमीच्या वतीने कमलकांता पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येईल.