प्रजासत्ताकदिनी फडकला निगडीत 107 मीटर उंचीचा भव्य तिरंगा
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सैनिक संस्था पुणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच 1971 भारत-पाक लढाई मध्ये पाकिस्तानात 24 किलोमीटर मुसंडी मारून 270 वर्ग किलोमीटर क्षेत्र काबीज करणारे रण बहादूर वीरचक्र विजेते कर्नल सदानंद बळवंत साळुंके यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. देशातील सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे, असा दावा पिंपरी पालिकेकडून करण्यात येत आहे.यावेळी महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर, सुमन पवळे, सचिन चिखले, कमल घोलप, उत्तम केंदळे, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ८४ वर्ष वयाचे कर्नल साळुंके हे पुण्यातून सायकल चालवत आले. त्यांच्या स्वागतासाठी सायकल मिञ परिवार व पिंपरी-चिंचवड बुलेट राईडर एम एच -14 ग्रुपचे सदस्य राहुल वाडकर, सुनील पाटील, भैयासाहेब लांडगे, डॉ. निलेश लोंढे यांनी नेतृत्व केले. ध्वजवंदन रॅली सकाळी सव्वाआठ वाजता चाफेकर चौकातून निघून वाल्हेकरवाडी-मिनी मिरॅकल स्कूल मार्गे भक्ती शक्ती उद्यानात सकाळी पावणे दहा वाजता दाखल झाली. शहरातील सर्व सायकलप्रेमी या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.