Breaking News

1 जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकर्‍यांच्या संपास 1 वर्ष पूर्ण एकाही आश्‍वासनाची पुर्तता नाही

शेवगाव / प्रतिनिधी । तालुक्यातील मळेगाव बसस्थानक मिरीमार्गे पांढरीपुल रस्त्यावर शुक्रवार दि. 1 जून रोजी सकाळी 9.00 वा. रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, दि.1 जून 2017 रोजी या शेतकर्‍यांच्या संपाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. परंतु शाससनाने दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पुर्तता केली नाही. याच्या निषेधार्थ शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे व मळेगाव माजी सरपंच चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली मळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशा आशयाचे लेखी निवेदन शेवगावचे तहसिलदार यांना दिले आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या पुर्ण करण्यास हे शासन अपयशी ठरले आहे. संपुर्ण शेतकर्‍यांची पूर्ण कर्जमाफी मिळावी पंरतु सरकारने मंजुर केलेली कर्जमाफी अनेक शेतकर्‍यांना वंचित ठेवणारी आहे. आज कोणत्याच शेतीमालाला हमी भाव नाही. शेती मालाला 50 टक्के हमीभाव मिळण्यासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

आजमितीस दुधाला मिळणारे दर दुध उत्पादकांना परवडणारे नाहीत, म्हणून गायीच्या दुधाला 30 रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लीटर 50 रूपये भाव मिळावा. मागील वर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. आजतागायत या मदतीपासून शेतकरी वंचित आहे. तसेच तूर व हरभरा यांची खरेदी नाफेडने सुरळीत करावी, या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर शिवराज कापरे, चंद्रकांत निकम, श्रीकांत निकम, ज्ञानेश्‍वर फसले, रावसाहेब देशमुख, भगवान शिंदे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. शेवगावचे निवासी नायब तहसिलदार धाडगे यांनी हे निवेदन स्वीकारले.