विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 24 तासात दुसरी आत्महत्या
नागपूर : विदर्भामध्ये पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याचे पाहावयाला मिळत आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात एका तरुण शेतकर्याच्या आत्महत्येला 24 तास लोटले नाही, तर नागपूर जिल्ह्यात दुसरी शेतकरी आत्महत्या झाली आहे. मौदा तालुक्यातील पिंपरी गावातील शंकर हरीभाऊ किरपाने या तरुण शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शंकर यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यासोबतच कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केले होते. पण नापिकी आणि शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. इतर शेतकर्यांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे शंकर किरपाने यांच्या कृषी सेवा केंद्रातील उधारीही वसूल झाली नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शंकर यांनी शुक्रवारी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. 5 एकर शेतीत नापिकीने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. अशा संकटात कृषी सेवा केंद्राचा आधार असायचा, पण परिसरातील शेतकरीही जगण्यासाठी पावलोपावली संघर्ष करत आहेत, त्यामुळे यंदा या शेतीच्या संकटात शंकर यांच्या कृषी सेवा केंद्राचीवसुलीही झाली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, खरिपाच्या तोंडावर शेतीत बी-बियाणे आणायला खिशात दमडीही नाही, कृषी सेवा केंद्रातही माल भरायला पैसा नाही. अशा आर्थिक संकटात जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेवटी शंकरने हार मानली आणि शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.