Breaking News

बहुजननामा- 23 तंत्र गर्दिचे जाणिले कुणी ???

बहुजनांनो.... !

कालची 11 मे ची समारोपाची ओबीसी जनगणना महापरिषद संपन्न(?) झाली. गेल्या एक महिन्यापासून राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाचा एक टप्पा परवा मुंबईत पूर्ण झाला. नेहमीच खाली खुर्च्या पाहण्याची सवय असलेल्या आमच्यासारख्या ओबीसी कार्यकर्त्याला कमी गर्दिचे फारसे दुःख नव्हतेच! कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्याच्या यशापयशाचे मुल्यमापन अनेक लोक आपापल्य पद्धतीने करीत असतात. त्यांनी ते करावे, आम्ही मात्र आमच्या भुमिकेवर ठाम आहोत.

एखादा कार्यक्रम यशस्वी झाला की, नाही झाला हे ठरविण्यासाठी काही कसोट्या आहेत. अलिकडे लोकशाहीच्या नावाने निवडणुकशाही सुरूआहे. या निवडणुकशाहीत डोकी मोजण्याची पद्धत आहे. तुमच्या बाजूने किती डोकी आहेत वा तुमच्या सभेला किती डोकी हजर होत्या,यावर तुमच्या निवडणुकशाहीचे राजकारण उभे असते. डोकी जमविण्याचे दोन प्रकार आहेत. एक तर लोकांच्या डोक्यातले विचार तुमच्याबाजूने असलेत किंवा ते तुमच्या बाजूने करवून घेतलेत तर तुमच्या सभेला गर्दि होते. निवडणूकशाहीत हा मार्ग परवडत नाही. मग यानिवडणूकशाही ने गर्दि जमविण्याचे नवे तंत्र शोधून काढले. समाजाचे भावनिक, हिंसक धृव्रीकरण घडवून आणने. यासाठी जात, धर्म, भाषा,वंशवाद वगैरेचा यथेच्छ व प्रछन्न वापर होतो. अशा धृवीकरणकृत गर्दिला जमविण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेकडून भरपूर रसद पुरविली जाते. ज्यांना आम्ही ‘’विशेष’’ म्हणून निमंत्रित केले होते ते केवळ अशा गर्दिचे दर्दी होते. ते आले नाहीत, याचे दुःख बाळगण्याचे कारण नाही. कारण आम्ही या पंथातले नाहीत, हे आधी स्पष्ट करू इच्छितो.

आम्ही फुले-आंबेडकरांचे पाईक आहोत. कार्यक्रम हा गर्दी जमविण्यासाठी नाही तर, ‘’समाजाला मेसेज’’ देण्यासाठी घेतो. पूर्ण महिन्याभराच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान गेले. नांदेडला 5 हजार लोक जमलेत म्हणून आम्ही हुरळून गेलो नाहीत व एक-दोन जिल्ह्यात कार्यक्रमच झाले नाहीत म्हणून निराशही झालो नाहीत. मुलभूत परिवर्तन हे गर्दीतून होत नसते. समाजाला दिशा देणार्‍या ‘मेसेज’ मधून होत असते. दिशादर्शक मेसेज देणार्‍या सभा-संमेलनाला गर्दी नसतेच. तथागत गौतम बुद्ध, तात्यासाहेब महात्मा फुले वा बाबासाहेब आंबेडकर यांनी काय लाखांच्या सभा घेऊन परिवर्तन घडवून आणले आहे काय? बाबासाहेबांनी लोकशाहीचे जे स्तंभ उभे केलेत, त्यावर पार्लमेंट अजूनही उभी राहात नाही आहे, आजही पार्लमेंटचे खांब भ्रष्ट कार्यपालीका, पक्षपाती न्यायपालिका व विकाऊ मिडिया हेच आहेत. यालाच निवडणूकशाही म्हणतात. त्यामुळे स्वतंत्र भारतात बाबासाहेब कधीच निवडणूक जिंकू शकले नाहीत. गर्दी जमविण्याच्या अ-लोकशाहीवादी तंत्राच्या आहारी ते जाणे शक्यच नव्हते.

मध्यंतरी सोशल ईंजिनियरिंगचा एक टप्पा येऊन गेला. या सभांना लाखांची गर्दी बघून आम्ही हुरळून गेलो होतो. बस्स, आता आमचे कांशिरामजी प्रधानमंत्री झालेच समजा! आणी कांशिरामजी प्रधानमंत्री बनने म्हणजे जातीव्यवस्था कायमची नष्ट होणे. कांशिराम साहेबांच्या लाखांच्या सभा बघून आम्हीही त्यांच्या पंथात गेलो होतो. परंतू नंतर लक्षात आले की, हे गर्दी जमविण्याचे नवे अ-लोकशाहीवादी तंत्र आहे. कधी ना कधी ते उघडे पडणारच! आणी तसे झालेही. अशा अ-लोकशाहीवादी तंत्राने मिळविलेल्या राजकिय सत्तेचा उपयोग शोषितांच्या हितासाठी कधीच करता येत नाही. व्हि.पी. सिंग हे पुर्ण मंडल आयोग लागू करीत नाहीत, असे कारण सांगून त्यांचे सरकार पाडण्यास मदत करणार्‍या कांशिरामसाहेबांची सत्ता उत्तर प्रदेशात अनेकवेळा आली. पूर्ण बहुमताच्या बसपा सरकारने उत्तर प्रदेशात मंडल आयोगाची एकही शिफारस लागू केली नाही. मात्र मंडल आयोगाची किमान एक शिफारस लागू करणार्‍या व त्यासाठी आपले सरकार धोक्यात घालणार्‍या महान मसिहा व्हि.पी. सिंगांचे सरकार पाडण्यास कांशिरामजींनी मदत का केली असेल बरे? याचे एकच कारण आहे, आणी ते म्हणजे ‘अ-लोकशाहीवादी तंत्रावर आधारित त्यांचे राजकारण होय! याला अपवाद लालू-मुलायम-भुजबळही नाहीत.

या ओबीसी-बहुजन नेत्यांच्या वाढदिवसाला लाखोंची गर्दी, मात्र हे नेते जेलमध्ये गेलेत तर, रस्त्यावर आंदोलन करायला कुत्रेसुद्धा नाही. आम्ही अशा गर्दीचे दर्दी कधिच नव्हतो. 1981 सालापासून आम्ही सुरू केलेले मंडल आयोगासाठीचे आंदोलन 5-50 श्रोत्यांपासून पासून सुरू झाले ते 5-10 हजाराच्यावर कधी गेलेच नाही. मात्र आमची प्रत्येक सभा ही दिशादर्शक मेसेज देणारी होती, जीचे पडसाद देशातल्या कानाकोपर्‍यात पोहोचत होते. ही अतिशयोक्ती वाटेल! तात्यासाहेबांनी चार मुलींची एकच शाळा पुण्यात काढली, जीने देशाच्या सामाजिक चळवळीची दिशाच बदलून गेली. माझ्यासारखे व माझ्याही पेक्षा जास्त पटीने काम करणारे असंख्य कार्यकर्ते ओबीसींचे मंडल आयोगाचे आंदोलन चालवित होते व आजही चालवीत आहेत. त्यातून जी जनजागृती झाली, तीची वोटबँक कॅश करण्यासाठी व्हि.पी. सिंगांनी मंडल आयोगाची एक शिफारस लागू केली. ओबीसींच्या या जागृत वोटबँकेने पुन्हा व्ही.पी. सिंगांचे सरकार आणले असते व पूर्ण मंडल आयोग लागूही झाला असता. मात्र व्हि.पी. सिंग हे फुले-आंबेडकरवादी नसल्याने ते ब्राह्मणी छावणीचा धार्मिक प्रती-हल्ला समजू शकले नाहीत, परिणामी पराभूत झालेत.

मुंबईच्या आझाद मैदानातून आम्हाला एक दिशादर्शक मेसेज द्यायचा होता. दलित-ओबीसी एकतेचा! आम्ही आमच्या बाजूने असा संदेश देण्यात यशस्वी झालो आहोत. ओबीसी जनगणनेचे हे एक महिन्याचे अभियान यशस्वी झाले की नाही, याचे मुल्यमापन करतांना गर्दीवर जाल तर स्तःची फसवणूक करून घ्याल! हा ईशारा मला बाबासाहेबांच्या सच्च्या वारसदाराला द्यावा लागतो आहे, याचे दुःख मात्र वाटते आहे.

सत्य की जय हो !!