Breaking News

वॉटर कप स्पर्धेत जैन संघटनेचे राज्यात 130 कोटींचे योगदान


सोलापूर, दि. 27, मे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) राज्यातील तीन हजार गावात जेसीबी व पोक लेन मशीन पुरवून 130 कोटींची कामे पूर्ण करून उद्दिष्ट पूर्ण केल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष केतन शहा यांनी केले. माढा तालुक्यातील वरवडे येथे पाणी फाउंडेशन वा ॅटरकप स्पर्धेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
 
यावेळी श्रीकांत मुंजाळ, अविनाश गायकवाड, दीपक घाडगे, संगीता गायकवाड यांनी वरवडे येथील 45 दिवसातील अनुभव कथन केले. प्रास्ताविक उद्योजक मनोज गायकवाड यांनी केले. त्यांनी ओढा खोलीकरण, कंपार्टमेंट, बल्डिंग व सीसीटीची कामे करण्यात आली असून 71 हजार 089 घ.मी. काम मशीनद्वारे तर 1851 घ.मी. काम श्रमदानाने केले आहे. त्यातून 7 कोटी 29 लाख 40 हजार लिटर पाणी साठणार आहे. कामासाठी लोकवर्गणीतून एक लाख 90 हजार, विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 50 हजार व इतर 3 लाख 90 हजार रुपये जमा झाल्याचे सांगितले. पुणे येथील उद्योजक शेखर शण्मुगम, गणेश लेंडघर व दिनेश थोरात यांनी 551 लीटर डिझेल उपलब्ध करून दिले. विद्यार्थी, शेतकर्‍यांनी गावातून रॅली काढली. सूत्रसंचालन नौदल व्यापार अधिकारी विश्‍वनाथ गायकवाड, विठ्ठल गायकवाड यांनी केले.