कुकडी कालवा सल्लागार समिती निर्णयः काल पासून चारी क्र.10 ते 14 ला पाणी
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनास अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गुरुवार 10 मे पासून सायंकाळी 6 वाजल्यापासून येडगाव धरणातून 500 क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. कुकडी धरणात सुमारे साडेसहा टी.एम.सी. 22 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामधून हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. तरच येडगावचे 40 दिवसांचे आवर्तन पूर्ण होणार आहे.
आवर्तन टेलकडे नेताना श्रीगोंद्यातील डीवाय चारी ते चारी क्रमांक 10 ते 14 ला अगोदर पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. मागील रोटेशनला वंचित राहिलेल्या शेतकर्यांना प्रथम पाणी देण्याचे ठरले असून नंतर कर्जतला पाणी देण्यात येणार असल्याची माहिती शाखा अंभियंता सोळुंकी यांनी दै. लोकमथंनशी दिली.
राजकीय हस्तक्षेप आणि पाणी मिळविण्यासाठी चिडलेला बळीराजा यांना तोंड देताना आधिकारी आणि कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पोलिस बंदोबस्तात पाणी सोडले जाणार आहे. परंतु भर उन्हाळ्यात सुटलेले आवर्तन शेतकर्यांना फळबागेसाठी संजीवनी ठरणार आहे. आवर्तनावेळी राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी दबंगिरी करणारे काही नेते मंडळी आवर्तनाचा फज्जा उडवण्यात पटाईत आहेत, अधिकारी लोकांच्या नियोजनात पाणी मिसळल्यास शेतकर्यांच्या फळ बागा जळून जातील. दै. लोकमथंनने 9-10 तारखेस पाणी सुटेल अशी बातमी गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती आणि तसेच घडले अशी चर्चा शेतकर्यांमध्ये सुरू आहे.