Breaking News

लेंडी तलाव परिसरात मद्यपी तरुणांवर कारवाई परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त

श्रीगोंदा  येथील पोलिसांनी शहरासह श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा पोलिसांनी काल सायंकाळी शहरातील लेंडी तलाव परिसरात नशा करून गोंधळ घालणार्‍या नशाखोर, व्यसनी तरुणांवर कारवाई केली असून, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


श्रीगोंदा शहरातील लेंडी तलाव परिसरात बसून अनेक तरुण विविध प्रकारची व्यसने करून महिला, मुलींची छेडछाड करणे, बिभस्त वर्तन करणे, आरडाओरडा करून गोंधळ घालणे असे प्रकार या तरुणांकडून सातत्याने घडत होते. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या अनेक तक्रारी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार पो.नि. पोवार यांच्या पथकाने काल सायंकाळी शहरातील लेंडी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी त्यांना हे नशाखोर तरुण गोंधळ घालत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणार्‍या ओमप्रकाश तपासे, पृथ्वीराज भापकर, शरद दरेकर, सागर देशमुख, महेश निकम, विशाल जंजाळ, मयूर घोडके, विशाल घोडके, सर्व राहणार श्रीगोंदा या आठ तरुणांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, बिभस्त वर्तन करणे, गोंधळ घालणे या कारणावरून पोलिसांनी पोलीस कायद्यानुसार कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.