मोडून पडला संसार, मोडला नाही कणा शेतमजूराच्या मदतीसाठी धावला तालुका
लोखंडेवाडी परिसरात राहणारे पोपट हुंडेकरी यांना पाच मुली आहेत, चार मुलींचे लग्न मोलमजुरी करून केले. पाचव्या मुलीचे लग्न 9 मे रोजी करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील देवीदास गलांडे यांचा मुलगा सागर यांच्याशी विवाह निश्चित करण्यात आला आहे, अशा परिस्थितीत चार दिवसांपूर्वी छपराला लागलेल्या आगीमुळे हुंडेकरी परिवरासमोर अस्मानी संकट उभे राहीले असतानाच, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन काम करत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने या कुंटूबाला एक क्विंटल धान्य देऊन मुलीसाठी पाच हजारांचे संसारोपयोगी भांडी सेट दिला. त्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी अश्विनीच्या लग्नासाठी किराणा देणार असल्याचे सांगितले. श्रीगोंदा येथील सतिश बोरा यांनी सोन्याचे मंगळसूत्र दिले. लग्नासाठी रत्नकमल मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले. सनराईज पब्लिक स्कूलचे सतिश शिंदे यांनी वर्हाडी मंडळींसाठी मोफत स्कूल बस उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीगोंदा येथील साईनाथ गॅस एजन्सीचे जयसिंग जवक यांनी मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. सतिश पोखर्णा हे कपडे खरेदीसाठी मदतीचा हात देणार आहेत. श्रीगोंदेकरांनी अश्विनीच्या विवाहासाठी मदत करण्याची तयारी दाखविल्यामुळे हुंडेकरी कुटुंबास मोठा आधार मिळाला आहे.