Breaking News

सात्रळ-तांभेरे रस्त्यावर विना संरक्षण कठड्याचा पूल!


सात्रळ प्रतिनिधी  - राहुरी तालुक्यातील सात्रळ तांभेरे रोडवरील गावापासून साधारण ६०० ते ७०० मीटर असलेल्या ओढ्यावरील पुलाला दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक कठडे किंवा सिमेंट कठडे नाहीत. त्यामुळे या परिसरात अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या रस्त्यावरून वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पुलावरील कठडे काही वर्षीपूर्वी झालेल्या पावसाळ्यात वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत याठिकाणी छोटेमोठे अपघात घडून गेले आहेत. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नळ्या टाकण्यात आल्या. परंतु त्यावरील कठडे अजून मात्र वाट पाहत आहे. सात्रळ, तांभरे तसेच तालुक्याला जोडणारा हा रस्ता असल्याने कायमस्वरूपी वर्दळ या रस्त्याने असते. या रस्त्यावर एस. टी. बसेस, ऊस वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, स्कूल बस, मोटारसायकल, अवजड वाहनांसह इतर अनेक प्रकारच्या वाहनांची वाहतूक होत असते. तसेच शाळकरी मुले, ओझे वाहणारे शेतकरी, दूध उत्पादक, शेतमजूर यांचा कधीही तोल जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत संरक्षण कठड्याअभावी अपघाती धोक्याची घंटा वाजत असल्याने कोणत्याही दुर्घटनेची प्रतिक्षा न करता संबंधित विभागाने आवश्यक त्या ठिकाणी तातडीने संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.