Breaking News

सातार्‍यात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यास तत्वत: मान्यता

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विद्यापीठ असलेल्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु करणेबाबत यापूर्वी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रस्तावित केलेल्या मागणीस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली. लवकरच एका संयुक्त बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपकेंद्राच्या जागेचा प्रश्‍न व अन्य अनुषंगीक प्रश्‍न सोडवण्यात येतील. यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व प्राध्यापक-सेवक वर्ग यांच्याकरीता मोठी सुविधा निर्माण होणार आहे, अशी माहिती सिनेट सदस्य व नगरसेवक अ‍ॅड. डि. जी. बनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.


याबाबत अ‍ॅड. बनकर यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात नमुद केले आहे की, राज्याचे शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे तसेच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या रास्त सुविधेसाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु होणेबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर मंत्री महोदयांनी उपकेंद्राच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागांवर जबाबदारी सोपवली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणेबाबत शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य यास नात्याने, शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य अमित कुलकर्णी यांचेसमवेत, कुलगुरु डा ॅ. देवानंद शिंदे यांचेकडे हा प्रश्‍न उपस्थित केला होता. सातारा येथे उपकेंद्र सुरु करण्यास त्यांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुन चर्चेदरम्यान सातारा येथे उपकेंद्र सुरु करण्यास शिवाजी विद्यापीठ सकारात्मक असल्याचे सांगितले.
सातारा येथे उपकेंद्र सुरु करण्यासाठी 2018 चे एप्रिल महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्हा प्रशासन, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत उपकेंद्राच्या जागेचा प्रश्‍न सोडवण्याबरोबरच, अन्य बाबींविषयी सर्व निर्णय घेतले जाणार आहे. त्यामुळे लवकरच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होवून, सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी सलग्न अनेक विद्यार्थी, प्राध्यापक-सेवक वर्ग व महाविद्यालयांची गैरसोय दूर होणार असल्याचे अ‍ॅड. बनकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.