Breaking News

धर्माच्या नावाखाली भारताच्या विभाजनाचा डाव : पी. चिदंबरम

तिरुवनंतपूरम - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजप सरकार धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करत आहे, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक तेढ निर्माण करून सांप्रदायिकता वाढीस लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीकाही चिदंबरम यांनी यावेळी केली.
केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एम.एम.हसन यांच्या नेतृत्वाखाली जनमोचना यात्रा काढण्यात आली होती. 7 एप्रिलला सुरू झालेल्या यात्रेने राज्याच्या 14 जिल्ह्यातील 20 लोकसभा आणि 60 विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला. देशातील दलित, आदिवासी, बालके आणि अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देश सांप्रदायिक फॅसिझमच्या सावटाखाली असून, केरळवरही राजकीय फॅसिझमचे संकट आहे. केरळमध्ये राजकीय कार्यकर्त्यांवरील हल्ले आणि खूनाच्या घटना सर्वसामान्य झाल्याची खोचक टिप्पणी चिदंबरम यांनी केली. तसेच सर्व अधिकार एकवटून संघराज्य संरचनेला मोदी सरकार आव्हान देत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला.