Breaking News

ट्रेनच्या धडकेत 13 चिमुकल्यांचा मृत्यू

कुशीनगर : मानवरहित क्रॉसिंग पार करताना शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या एका व्हॅनला ट्रेनने धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला. कुशीनगरातील विशुनपुरा ठाणे भागातील दुदही बहपुरवा रेल्वे क्राँसिंगवर सकाळी 6.50 वाजताच्या सुमारास सिवानहून गोरखपूरला जाणार्‍या 55075 गाडीची स्कुलव्हॅनला धडक बसली. यात व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. ही घटना व्हॅन फाटकनसलेले रेल्वे क्रॉसिंग पार करत असताना घडली. व्हॅन क्रॉसिंगवर जाताच, सिवानहून गोरखपूरला जाणारी ट्रेन आली आणि व्हॅनला धडकली. व्हॅनमधील सर्व विद्यार्थी डिव्हाईन पब्लीक स्कूलचे असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही, तर या गाडीत एकूण 25 विद्यार्थी होते, असेही सांगितले जात आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरखपूर पोलिसांना घटनेच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी जखमी विद्यार्थी आणि मरण पावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. योगी म्हणाले, प्रथमदर्शनी व्हॅन ड्रायव्हरची चूक असल्याचे दिसून येत आहे. त्याने इअरफोन लावले होते. त्याचे वयही अद्याप समजलेले नाही. नियम आहेत, ते का पाळले नाही? यासंदर्भातही चौकशी केली जाईल. तसेच याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल.