Breaking News

कर्जमाफी एकाला मेसेज दुसर्‍याला


श्रीगोंदा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजना या नावाखाली राज्य सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याचा गाजावाजा करत आहे. मात्र ज्या व्यक्तीच्या नावे गुंठाभरही जमीन नाही, कोणत्याही बँकेचे कर्ज नाही, अश्या व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ बँक खात्यात जमा केल्याचा मेसेज आला असल्यामुळे सरकारचा पारदर्शी कारभार दिसून येतो. 

सध्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजना या नावाखाली राज्य सरकार कर्जमाफी देत आहे. या योजनेत ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, त्याच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाते, त्याचबरोबर हे अर्ज भरताना शेतकर्‍यांची परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हे अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी अतिशय चाणाक्ष राहून आपले अर्ज दाखल केले आहेत. यात स्वतःचे आधार कार्ड, बँक खाते, कर्ज खाते, सोसायटीचे व बँकेचे किती कर्ज आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली. त्यावेळी सरकार ने ही कर्जमाफी अतिशय पारदर्शी असल्याचे सांगीतले होते.

कर्जमाफीची अर्ज भरताना काही शेतकर्‍यांना अडचणी आल्या होत्या, त्यामुळे काही शेतकरी वंचित राहिले होते, पण सरकार ने आता मुदत वाढवून दिली आहे, परंतू यापुर्वी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. परंतू नुकतचं काही शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून मेसेज पाठवून कर्जमाफीचा लाभ दिल्याबद्दल माहिती देण्यात येत आहे. अश्याच प्रकारचा मेसेज आढळगाव येथील मनोज छत्तीसे या मजूरी करणार्‍या व्यक्तीला आला आहे. त्यामुळे सरकार नेमके कशा प्रकारे पारदर्शी कारभार करते हे दिसून येते. छत्तीसे यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही. कोणत्याच बँकेचे कर्जही नाही, तरीसुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचा मेसेज येतो ही विशेष बाब आहे. 


अच्छे दिन ?
राज्य सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देत आहे. ही चांगली बाब आहे, मात्र माझ्या नावावर एक गुंठाही जमीन नाही. मी कोणत्याही प्रकारचा कर्जमाफीचा अर्ज भरलेला नाही. अथवा माझा मोबाईल क्रमांकही कुठे दिला नाही. तरी सुद्धा मला माझ्या सेंट्रल बँकेच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ दिला असल्याचा मेसेज आला आहे. त्यामुळे हे अच्छे दिन दिसतात, असे वाटते अशी प्रतिक्रिया मनोज छत्तीसे यांनी दिली.