Breaking News

काम तर झाले नाही मात्र पाय गमविण्याची वेळ आली होती


श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात काही कामानिमित्त आलेल्या महिलेचे काम तर झालेच नाही पण पाय गमवायची वेळ आली होती. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी तहसील कार्यालयाच्या आवारात घडला. याबाबत पोलिसांत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तहसील कार्यालयात नेहमीच सर्वसामान्य नागरिकांची ये-जा असते, कोणाचे शिधापत्रिकेचे काम असते, तर कोणाचे जमिनीचे. याबाबत तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. अश्याच प्रकारे दि. 5 एप्रिल रोजी म्हातारं पिंप्री येथील एक महिला कामानिमित्त तहसील कार्यालयात आली होती. ही महिला उन्हाची तीव्रता असल्यामुळे आवारात लावलेल्या एका चारचाकी गाडीच्या सावलीला बसल्या होत्या. त्याचवेळी गाडी चालक आला व गाडी चालू करून पुढे जाऊ लागला, त्यावेळी महिलेचा मोठ्याने आवाज आल्याने त्याने गाडी थांबवली व पाहिले तर गाडीच्या चाकाखाली त्या महिलेचे पाय अडकले असल्याचे दिसले. त्याने तात्काळ गाडी पाठीमागे घेतली व त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर महिलेचे नातेवाईक आले. आपापसात समझोता करून या प्रकरणावर पडदा टाकला. या महिलेचे काम तर झालेच नाही मात्र आपले पाय गमावण्याची वेळ त्या महिलेवर नक्की आली होती.