Breaking News

हैसगावचे ग्रामस्थ झाले आक्रमक! तलाठी कार्यालयाला टाळे


राहुरी ता. प्रतिनिधी  - म्हैसगाव येथील तलाठी थोरात आणि कोतवाल खामकर यांच्या गैरकारभारावरून येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. याप्रकरणी श्रमिक मुक्तीदलाने आज {दि. १३} तलाठी तसेच कोतवालाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवत तलाठी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.

महसूल कराच्या पावत्या न देणे, मनमानी रक्कम वसूल करणे, दाखले व उताऱ्यांची फी अतिरिक्त आकारणे, महसूल रेकॉर्डच्या नोंदी पैसे घेतल्याशिवाय न करणे, किंवा वर्षानुवर्षे नोंदी टाळणे आदी गंभीर तक्रारी यावेळी करण्यात आल्या. विशेष म्हणजे यासाठी मंगळवारी {दि. १० } मोर्चा काढण्यात आला होता. दि. १० ला म्हैसगावचा आठवडीबाजार होता. तसेच श्रमिक मुक्तीदलाच्या आंदोलनाचेही कारण होते. परंतु तरीही तलाठी कार्यालयाचे जबाबदार अधिकारी थोरात व कोतवाल खामकर यापैकी कोणीही कार्यालयात हजार नव्हते. या घटनेचा तीव्र निषेध आंदोलकांनी व्यक्त करून या दोघांविरुद्ध कारवाईची मागणी केली. आंदोलनास ताहाराबाद मंडळाचे मंडलाधिकारी डोखे यांनी दुपारी उशिरा {१ वा.} येऊन आंदोलनासंदर्भातील मागण्यांवर तहसीलचे उत्तरादाखल पत्र दिले. तलाठी थोरात यांच्याकडून अहवाल मागून घेऊन कारवाईसाठी प्रांत अधिकारी श्रीरामपूर यांना पाठविण्यात आल्याचे पत्रातून कळविले.

तरी आंदोलनाच्या दिवशी तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थित आणि उशिराने आलेले मंडलाधिकारी डोखे आदी सर्व प्रकाराचा निषेध यावेळी करण्यात आला. महसुलचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने दि. १२ तारखेला नायब तहसीलदार तळेकर यांनी निवेदन न स्विकारल्याचे भेटून सांगितले. त्यांनतर राहुरी पोलीस निरीक्षकांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनात डॉ. जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, गंगाभाऊ काकडे, उत्तम बर्डे, कैलास बुळे, अण्णा विधाते, गंगा दत्तू काकडे, दशरथ बर्डे, हिरामण भुतांबरे, संदीप मुठे, नवनाथ गवळी, गणेश वायाळ, काशिनाथ कोकाटे, रघुनाथ बुळे, आबा काकडे, संजय दुधवडे, भास्कर केदार, गोरख केदार, भिवा केदार, खेमा कातोरे, सुभाष नंदकर आदींसह शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.